हरियाणा विधानसभेसाठी दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांची आघाडी, भाजपा, काँग्रेसचं टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:34 PM2024-08-27T16:34:45+5:302024-08-27T16:35:31+5:30
Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.
हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता राज्यातील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, हरियाणामध्ये आकारास येत असलेल्या दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षांच्या आघाडीमुळे अनेक समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी यांच्यातील आघाडीची औपचारिक घोषणा झाली आहे. हरियाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी ७० जागांवर जननायक जनता पार्टी निवडणूक लढेल. तर २० जागांवर आझाद समाज पार्टी निवडणूक लढवणार आहे.
या आघाडीच्या घोषणेनंतर चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, या आघाडीची घोषणा आज करण्यात आली आहे. मात्र त्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. हरियाणा पुढे गेला पाहिजे, ही आमच्या मनातील इच्छा आहे. भीम आर्मी आणि आझाद समाज पक्ष येथे बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. तर जेजेपीचे सर्व नेते आमि भावी मुख्यमंत्रीही आपल्यासोबत आहेत. आजपासूनच कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला लागा, असं आवाहन मी माझ्या कार्यकर्त्यांना करतो, असेही चंद्रशेखर आझाद यावेळी म्हणाले.