मस्जिदच्या नुतनीकरणावेळी मंदिराचे वास्तूशिल्प आढळले, प्रशासनाने काम थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 03:36 PM2022-04-22T15:36:06+5:302022-04-22T15:36:57+5:30
मस्जिद प्रशासनाकडून जेव्हा नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी, ही वास्तू आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
मंगळुरू - कर्नाटकच्या मंगळुरूच्या बाहेरील परिसरात गुरुवारी एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखे वास्तूशिल्प आढळून आले. हे वास्तूशिल्प समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडून कागदपत्रांची तपासणी होईपर्यंत हे काम बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार मंगळुरूच्या बाहेरील मलाली येथील जामा मस्जिदमध्ये नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी, हिंदू मंदिरासारखे वास्तूशिल्प दिसून आले.
मस्जिद प्रशासनाकडून जेव्हा नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी, ही वास्तू आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कधीकाळी एखादं हिंदू मंदिर येथे उभारण्यात आलं असावं. विहिंपने सध्या येथे धाव घेतली असून जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री पडताळणी होईपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दक्षिण कन्नड आयुक्तालयाने या घटनेची दखल घेत पुढील आदेश येईपर्यंत हे काम जैसे थे स्थितीतच ठेवण्याचे सांगितले आहे.
प्रशासनाकडून जमिनीच्या रेकॉर्डची पडताळणी व तपास करण्यात येत आहे. तसेच, लोकांनी शांतता राखावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. दक्षिण कन्नडचे उपायुक्त राजेंद्र केवी यांनी म्हटलं की, परिक्षेत्रातील अधिकारी आणि पोलिसांकडून आपणास यासंदर्भात माहिती मिळाली. जिल्हा प्रशासन जुने रेकॉर्ड आणि मालकी हक्काच्या विवरणाची माहिती घेत आहे. वक्फ बोर्ड आणि न्याय विभागाकडूनही मदत घेण्यात येईल, असे केवी यांनी म्हटले आहे. लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावे, शांतता राखावी, असे आवाहनही केवी यांनी केले आहे.