वाद पेटला! RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी, लखनौमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:59 AM2022-06-07T08:59:55+5:302022-06-07T09:06:20+5:30
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
लखनौ - भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी विशिष्ट धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात ५७ सदस्यदेश असलेल्या ओआयसीने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी लक्ष ठेवावे, असे ओआयसीने म्हटले आहे. इस्लामिक देशांमध्ये भारताला विरोध होताना दिसत आहे. त्यातच, आता RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी लखनौमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. कतार आणि कुवेतनंतर इराणनेही भारतीय राजदूताला बोलावले आहे. सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे देशातील लखनौ आणि उन्नाव येथील RSS चे कार्यालय उडवून देण्याची धमकी व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात आली आहे. याप्रकरणी लखनौमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. युनियन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून लखनौच्या माडियाव पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ आणि उन्नाव येथील युनियन ऑफिसला उडवून देण्याची धमकी सोमवारी रात्री 8 वाजता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात आल्याचे समजते. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या लिंकद्वारे ही धमकी देण्यात आली होती. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भाजप नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, काय आहे वाद?
भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेत एका धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हिंसक घटना घडल्या. तसेच वादग्रस्त ट्वीटमुळे भाजप नेते नवीनकुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भाजपच्या शिस्तपालन समितीने म्हटले की, शर्मा यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपच्या ध्येय-धोरणांचा भंग केला. त्यासंदर्भात पक्षांतर्गत चौकशी होणार आहे. सोशल मीडियातून हा वाद जगभर पोहोचला असून आखाती देशांनीही या वादावर भारताचा निषेध केला आहे. तसेच, भारतीय राजदूतांना बोलावून घेतले आहे. तर, भारतीय मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.