मुलांना घरीच शिकवा कुराण, 'मदरसा' शब्दाचं अस्तित्व संपायला हवं; 'या' मुख्यमंत्र्यानं केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 10:19 AM2022-05-23T10:19:51+5:302022-05-23T10:22:44+5:30
Himanta Biswa Sarma Statement on Madrassa: बिस्वा सरमा पुढे म्हणाले, 'मुलांना त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करून मदरशांमध्ये पाठवले जाते. शाळांमध्ये विज्ञान, इंग्रजी आणि गणितासारख्या विषयांवर भर असायला हवा.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी, देशातील सर्व शाळांमध्ये एकसमान आणि सामान्य शिक्षण असायला हवे, यावर भर दत, 'मदरसा' शब्दाचे अस्तित्व आता पूर्णपणे संपुष्टात यायला हवे. तसेच, मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी अभ्यास करायला हवा, असे म्हटले आहे. ते दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
'जोवर हा शब्द असेल, तोवर मुले डॉक्टर-इंजिनिअर होण्याचा विचार करू शकणार नाहीत' -
आसामचे मुख्यमंत्री सरमा म्हणाले, जोवर हा शब्द (मदरसा) असेल, तोवर मुले डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याच्या दृष्टीने विचारच करू शकणार नाहीत. खरे तर, मदरशांमध्ये शिकून तुम्हाला डॉक्टर अथवा इंजिनिअर होता येणार नाही, असे जेव्हा तुम्ही मुलांना सांगाल, तेव्हा ते स्वतःच मदरशात जाण्यास नकार देतील.
'धार्मिक ग्रंथ शिकवा पण घरात' -
बिस्वा सरमा पुढे म्हणाले, 'मुलांना त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करून मदरशांमध्ये पाठवले जाते. शाळांमध्ये विज्ञान, इंग्रजी आणि गणितासारख्या विषयांवर भर असायला हवा. धार्मिक ग्रंथ घरात शिकवले जाऊ शकतात. तर शाळांमध्ये मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी शिकवायला हवे.'
मदरशातील विद्यार्थी हुशार असतात... यावर काय म्हणाले सरमा? -
शिक्षणतज्ज्ञांच्या या सत्रात एका निवृत्य शिक्षणतज्ज्ञांने विचारले, की मदरशांतील विद्यार्थी खूप हुशार असतात. ते कुरानचा प्रत्येक शब्द सहजपणे लक्षात ठेवतात. यावर सरमा म्हणाले, 'सर्वच मुस्लीम आधी हिंदू होते. कुणीही मुस्लीम भारतात जन्माला आला नव्हता. भारतात प्रत्येक जण हिंदूच होता. यामुळे, जर एखादा मुस्लीम मुलगा खूप हुशार असेल, तर मी त्याच्या हिंदू पूर्वजांनाही त्याचे काही प्रमाणात श्रेय देईन.