बसमध्येच दिला बाळाला जन्म; कंडक्टरच्या माणुसकीचं IAS अधिकाऱ्याकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 01:08 PM2023-05-18T13:08:54+5:302023-05-18T13:09:58+5:30
बंगळुरू-चिकमंगळूर जाणाऱ्या बसमध्ये आसामची रहिवाशी असलेली फातिमा आपल्या सासूसोबत बसली होती
बंगळुरू - कर्नाटक राज्य सडक परिवहन निगमच्या म्हणजे KSRTC च्या एका बसमध्येच महिला प्रवाशाने गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे योगायोगाने बसमधील वाहक या महिला असल्याने त्यांनी प्रसंगावधानता बाळगत प्रवाशी महिलेला मोठा आधार दिला. वसंत्तमा असं या महिला वाचकाचं नाव असून प्रवासादरम्यान जवळ कुठलेही रुग्णालय नसल्याने त्यांनी इतर महिला प्रवाशांच्या मदतीने गरोदर महिलेची बसमध्ये डिलीव्हरी केली. त्यांच्या या कार्याचं परिवहन विभागाच्या IAS अधिकारी जी. सत्यवती यांनी कौतुक केलंय.
बंगळुरू-चिकमंगळूर जाणाऱ्या बसमध्ये आसामची रहिवाशी असलेली फातिमा आपल्या सासूसोबत बसली होती. एका कॉफी प्लांटेशनमध्ये काम करत होती. दुपारी जवळपास १.२५ वाजता उदयपुरा एग्रीकल्चर कॉलेजजवळ पोहोचल्यानंतर फातिमाला पोटात कळा येऊ लागल्या. त्यावेळी, वाहक वसंत्तमा यांनी ड्रायव्हरला लागलीच बस थांबवण्याचे सांगितले. तसेच, बसमधील इतर प्रवाशांनाही बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी, वसंत्तमांच्या मदतीने या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.
वसंत्तमा यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं सर्वांनीच कौतुक केलं. विशेष म्हणजे, फातिमा यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे समजताच बसमधील प्रवाशांना मदतीचं आवाहनही वसंत्तमा यांनी केलं होतं. त्यामुळे, प्रवाशांकडून १५०० रुपये जमा झाले, जे फातिमाला देण्यात आले. त्यानंतर, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसंतम्मा यांनी दाखवलेल्या माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं एसटी महामंडळातही कौतुक होत आहे. तर कर्नाटक स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर जी सत्यवती यांनीही वसंत्तमांचं कौतुक केलं आहे. तर, वसंतम्माचं काम हे माणुसकीचं आदर्श उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलंय.