बँक घोटाळ्यातील रक्कम वसूल करणार; तक्रारीला विलंब नाही, SBI चं म्हणणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 08:22 AM2022-02-14T08:22:43+5:302022-02-14T08:23:02+5:30
एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही.
नवी दिल्ली : एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेल्या बँकेच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, आम्ही शक्य तितकी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करू, असे एसबीआयने म्हटले आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखाली २ डझनहून अधिक लोकांना कन्सोर्टियम व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर २०१३ मध्येच कंपनीचे खाते एनपीए झाले. कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश आले नाही, असे एसबीआयने म्हटले.
एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला अन्य बँकांकडून तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत करण्यात आले. सर्वात पहिली तक्रार नोव्हेंबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आली होती. २०२१ मध्ये एक सर्वसमावेशक तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये बँकांकडून कोणताही उशीर झालेला नाही. शिपयार्ड
२०१३ पासून तोट्यात आहे, असे बँकेने म्हटले आहे.
मोदींच्या कार्यकाळात ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक : राहुल गांधी
एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून सर्व बाजूंनी सरकारवर टीका होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.