‘मेमंथा सिद्धम’ने सुरू झाली निवडणुकांची रणधुमाळी, सर्वच पक्षांनी कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:24 PM2024-03-30T12:24:33+5:302024-03-30T12:25:15+5:30
जगन यांचा दौरा कडप्पा येथील इदुपुलुपाया येथून सुरू झाला. २१ जिल्हे आणि १४८ विधानसभा मतदारसंघांमधून जाईल आणि उत्तर आंध्र प्रदेशात प्रचार मोहिमेचा समारोप होईल.
- डॉ. समीर इनामदार
अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस याही निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखते का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. आंध्र प्रदेशच्या १७५ विधानसभा आणि २५ लोकसभेच्या जागांसाठी एकाच वेळी १३ मे रोजी निवडणूक होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) प्रमुख आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी कडप्पा येथून ‘मेमंथा सिद्धम’ (आम्ही सर्व तयार आहोत) या २१ दिवसांच्या बस दौऱ्याला आंध्र प्रदेशातील आगामी निवडणुकांसाठी प्रारंभ केला.
जगन यांचा दौरा कडप्पा येथील इदुपुलुपाया येथून सुरू झाला. २१ जिल्हे आणि १४८ विधानसभा मतदारसंघांमधून जाईल आणि उत्तर आंध्र प्रदेशात प्रचार मोहिमेचा समारोप होईल. जगन यांनी वडील आणि माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या पुतळ्याला इडुपुलुपया येथील वायएसआर घाट येथे पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. हा घाट पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघात असून, जगन हे या मतदारसंघातून आमदार आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनीही या निवडणुकीत उमेदवार घोषित केले आहेत.
तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडूही प्रचारात व्यस्त आहेत. कुप्पम या त्यांच्या गृह मतदारसंघात त्यांनी दोन दिवस प्रचार केला. तर, जनसेनाप्रमुख पवन कल्याण हेदेखील ३० मार्च रोजी अनकापल्ले येथून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. अभिनेते असणारे पवन कल्याण हे अनकापल्ले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
२०१९ ची स्थिती
लोकसभा निवडणूक
एकूण जागा २५
वायएसआर काँग्रेस २२
तेलुगू` देसम पार्टी ३
काँग्रेस ०
भाजप ०
जनसेना पार्टी ०
विधानसभा निवडणूक
एकूण जागा १७५
वायएसआर काँग्रेस १५१
तेलुगू देसम पार्टी २३
काँग्रेस ०
भाजप ०
जनसेना पार्टी १