पतीच्या मृत्यूची खबर हॉस्पिटलने कळविली, पत्नीने आत्महत्या केली, आता सांगतायत तो जिवंत...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:35 AM2024-01-06T10:35:49+5:302024-01-06T10:36:41+5:30
मेडिकल कॉलेजच्या छतावरील एसीचा मेन्टेनन्स करण्यासाठी मेकॅनिक आले होते. तेव्हा कॉम्प्रेसरचा स्फोट झाला होता.
ओडिशामध्ये विचित्र घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केली आहे. यानंतर चार दिवसांनी त्या हॉस्पिटलने तिचा पती जिवंत असल्याचे कळविले आहे. भुवनेश्वरच्या हॉस्पिटलमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. व्हेंटीलेटरवर असलेल्या जखमीने तो दिलीप असल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
२९ डिसेंबरच्या सायंकाळी भुवनेश्वरच्या हाय टेक मेडिकल कॉलेजच्या छतावरील एसीचा मेन्टेनन्स करण्यासाठी जगन्नाथ रेफ्रिजरेशन एजन्सीतून काही लोक आले होते. तेव्हा एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये हे तिन्ही मेकॅनिक गंभीररित्या भाजले होते. त्यांना जखमी अवस्थेत त्याच हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. ३० डिसेंबरला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलीप नावाच्या मेकॅनिकचा मृत्यू झाल्याचे कळविले.
यामुळे धक्का बसलेल्या दिलीपची पत्नी सौम्यश्री जेना हिने १ जानेवारीला तिच्या आई-वडिलांच्या घरी आत्महत्या केली. तिचे वडील सदाशिव यांनी सांगितले की, ३० डिसेंबरला दिलीपचा मृतदेह आम्हाला देण्यात आला. पुढच्या दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलीपचा मृतदेह असल्याचे आम्हाला सांगितले होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आता माझ्या मुलीने प्राण गमावले आहेत. यासाठी जबाबदार कोण आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिलीपची आई अहल्या सामंत्रे यांनी सांगितले की, ती जेव्हा-जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायची तेव्हा तिला मुलाला भेटू दिले जात नव्हते. तर खाजगी रुग्णालयाच्या सीईओ स्मिता पाधी रेफ्रिजरेशनचे बादल साहू यांच्यावतीने जखमींची ओळख पटवण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. जखमींच्या नातेवाईकांनीही त्यांची ओळख पटवली होती.