भाजपा अन् जेडीयूमध्ये असा निर्माण झाला दुरावा; नेमकी कुठे अचानक माशी शिंकली, पाहा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:13 AM2022-08-10T08:13:59+5:302022-08-10T08:25:16+5:30
लालू - नितीश यांच्यात पुन्हा मैत्री; चिराग पासवान- आरसीपी सिंह निमित्त
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपले सरकारी निवासस्थान सोडून लालू प्रसाद यादव यांच्या शेजारच्या बंगल्यात राहावयास गेले तेव्हापासून दोघांत दृढ सलोखा झाला. त्याची निष्पत्ती मंगळवारी नवीन राजकीय समीकरणांतून दिसून आली. अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लालुंसोबत पुन्हा मैत्री करण्याची गरज नितीश कुमार यांना पडली.
लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यात एवढा सलोखा वाढला की, ६ जुलै रोजी नितीश कुमार हे पाटण्यातील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले लालू प्रसाद यादव यांना भेटण्यास गेले. त्यांनी लालू प्रसाद यांना सरकारी खर्चाने उपचारासाठी दिल्लीला पाठविण्याची आणि गरज पडल्यास उपचारासाठी सिंगापूरला नेण्याचे घोषित केले.
नितीश कुमार यांची सहमती नसताना पंतप्रधान मोदी यांनी जेडीयूच्या कोट्यातून आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदी नियुक्त करून नितीश कुमार यांना आणखी नाराज केले. नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठविण्यास नकार तर दिलाच; शिवाय अधिक संपत्ती जमविल्यासंदर्भात नोटीसही पाठविली होती. यादरम्यान नितीश कुमार यांना असे वाटायचे की, भाजप जेडीयूचे आमदार फोडून स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा लोकांना हेरून त्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले होते की, भाजप विचारधारेचा पक्ष आहे. अन्य सर्व पक्ष संपतील. जे झाले नाहीत, तेही लवकरच नामशेष होतील. केवळ भाजपच असेल. त्यांचे हे वक्तव्य नितीश कुमार यांच्यासह विरोधी पक्ष आणि मित्रपक्षांनी इशाराच मानला. जेडीयूने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊनही नितीश कुमार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी गेले नव्हते.
तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभानिमित्त २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित प्रीतीभोजनातही ते सहभागी झाले नव्हते. २५ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी नव्हते. कोरोनामुळे ते रविवारी आयोजित निती आयोगाच्या बैठकीलाही गेले नव्हते; तथापि, त्याच दिवशी पाटण्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले.
चिराग पासवान यांचा भाजपकडून वापर
मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चिराग पासवान यांच्या माध्यमातून जेडीयूचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते; परंतु, भाजपविरुद्ध उमेदवार मैदानात उतरविले नव्हते.
परिणामी जेडीयूच्या आमदारांची संख्या २०२० मध्ये ४३वर आली, तर भाजपचे संख्याबळ वाढून ५३ वरून ७४ झाले. २०१५ मध्ये जेडीयूचे संख्याबळ ७२ होते. चिराग पासवान हे स्वत:ला मोदी यांचे हनुमान म्हणतात. त्यांना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकांना बोलावले जाते. हा प्रकार नितीश कुमार यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा होता.