President Election: भाजपा लवकरच करणार राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा, ही नावं आघाडीवर, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 08:54 PM2022-05-08T20:54:36+5:302022-05-08T21:01:03+5:30
President Election: भाजपा लवकरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा ओबीसी किंवा कुठल्यातरी महिला नेत्याला राष्ट्रपदीपदाचा उमेदवार बनवू शकतो.
नवी दिल्ली - भाजपा लवकरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा ओबीसी किंवा कुठल्यातरी महिला नेत्याला राष्ट्रपदीपदाचा उमेदवार बनवू शकतो. ओबीसी आणि महिलांची देशातील संख्या लक्षणीय आहे. मात्र अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि दक्षिण भारतातील उमेदवार यासारखी समीकरणे राजकीय वर्तुळात मांडली जात आहेत. पक्षाकडून सर्व शक्यतांची चाचपणी केली जात आहे. मात्र पक्ष सर्व शक्यतांची पडताळणी आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक विचारात घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा करेल.
देशात जातीच्या आधारावर जनगणनेची मागणी होत असतानाच राजकीय पक्षांना देशात ओबीसींची संख्या ही ४० टक्क्यांच्या वर असल्याची कल्पना आहे. तर लोकसंख्येतील महिलांचा वाटा हा जवळपास निम्मा आहे. महिला ह्या नवी व्होटबँक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार सांगितले आहे.
उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत सर्व राज्यांमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. हल्लीच उत्तर प्रदेशमध्ये काही ओबीसी नेते पक्षाबाहेर गेल्यानंतरही भाजपाला लक्षणीय बहुमत मिळाले होते. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूसह सर्वच पक्षांनी ओबीसी समुहाचा विश्वास जिंकण्यासाठी जातीआधारित जनगणनेची मागणी केली आहे. त्यामधील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारपदासाठी संधी दिल्यास पक्षाला पुढील निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
भाजपाचया एका वरिष्ठ नेत्याने सांगिकले की, महिला आणि ओबीसी दोन्ही स्वतंत्रपणे देशातील मतदारांचा एक मोठा भाग आहे. पक्ष वैयक्तिकपणे किंवा व्यक्तिगतपणे एकत्र ओबीसी महिला उमेदवाराल पदासाठी संधी देऊन दोन्ही प्रकारच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. सध्या छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया उईके, तामिळनाडूच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची नावं संभाव्य राष्ट्रपतीपदाच्य उमेदवारांमध्ये आहेत. तसेच झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचंही नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून समोर येत आहे.