जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील पुस्तक 'जवाहर'चे उद्या विमोचन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 09:47 AM2023-12-03T09:47:45+5:302023-12-03T09:47:58+5:30
अद्भूत राजकीय कौशल्य, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व उलगडणार, जवाहरलाल दर्डा यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कित्येक शतकांतून एकदाच जन्माला येत असते.
नवी दिल्ली : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तसेच राजकीय व सामाजिक नेते जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित पुस्तक 'जवाहर'चे विमोचन सोमवार, दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते होणार आहे.
आपले संपूर्ण जीवन गरिबांच्या कल्याणासाठी तसेच दलितांच्या उत्थानासाठी समर्पित करणारे कट्टर गांधीवादी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनाचे विभिन्न पैलू या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आले आहेत. येणाऱ्या पिढ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षापासून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा रोमहर्षक संघर्ष, समाजातील गरीब व दलितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले महान कार्य व संघर्ष आणि नैतिक मूल्यांनी दीप्तिमान झालेली त्यांची जीवनयात्रा या पुस्तकात प्रकाशमान झालेली आहे.
जवाहरलाल दर्डा यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कित्येक शतकांतून एकदाच जन्माला येत असते. दर्डा यांचे संपूर्ण जीवन देशासाठी प्रेरणादायी होते. त्यांनी अद्भुत साहस, नेतृत्व, कौशल्य आणि नैतिक मूल्यांसोबत भारतास महान बनविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांचे विचार आणि कार्य आपणा सर्वांना पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देते
यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष पद्मभूषण गुलाम नबी आझाद हेदेखील उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील माजी मंत्री विनोद तावडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी हेही या कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत. आपल्या विचारांमुळे माध्यमांमध्ये वेगळी ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री अलोक मेहता यांची उपस्थिती हा कार्यक्रम संस्मरणीय बनवेल. वर्ल्ड पीस सेंटर आणि अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनीजी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
आयोजन स्थळ दिनांक : ४ डिसेंबर २०२३ वेळ: ४ वाजता स्थळ : स्पीकर हॉल, भारतीय संविधान समिती, रफी मार्ग, नवी दिल्ली