दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा सापडला, पाहताच आई ढसाढसा रडायला लागली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:02 IST2025-01-31T20:00:53+5:302025-01-31T20:02:04+5:30
दोन वर्षांपूर्वी मुलगा पार्कमध्ये घेळायला गेला असता, त्याला कुणीतरी उचलून नेले होते.

दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा सापडला, पाहताच आई ढसाढसा रडायला लागली...
Rajasthan News : राजस्थानच्या अलवरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या बेगुसराय येथून दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला 13 वर्षांचा मुलगा अखेर आई-वडिलाना सापडला. आईने दोन वर्षांनंतर आपल्या पोटच्या गोळ्याला पाहताच हंबरडा फोडला. मुलानेही आपल्या आईला पाहून तिला घट्ट मिठी मारली. हा भावनिक क्षण पाहून तेथे उपस्थित सर्वांचेच डोळे पानावले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये आदेश(13) खैरथल रेल्वे स्टेशनवर रडताना अधिकाऱ्यांना दिसला होता. त्यानंतर आरपीएफने त्याला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. बाल कल्याण समितीने त्याला राधा बालगृहात पाठवून त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. तो दिल्लीतील लाल किल्ला परिसरात राहतो, असे आदेशात म्हटले होते. यानंतर टीम त्याला अनेकवेळा दिल्लीत घेऊन गेली, मात्र कोणताही सुगावा लागला नाही.
बालकल्याण समितीने आदेशाच्या आधारकार्डमधून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, अखेर आधार कार्डद्वारे, तो बिहारच्या बेगुसराय येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. तेथे संपर्क साधला असता एका दुकानदाराने त्यांच्या कुटुंबाचा नंबर दिला. फोनवर बोलणे होताच आदेशचे वडील अरविंद शरण आणि आई कामिनी त्याला घेण्यासाठी अलवरला पोहोचले.
आईने आपल्या मुलाला पाहताच त्याला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. वडील अरविंद यांनी सांगितले की, आदेश पार्कमध्ये खेळायला गेला होता, तिथून कोणीतरी त्याचे अपहरण केले आणि खैरथल स्टेशनवर सोडले. हे कुटुंब दिल्लीत मजुरीचे काम करते आणि दोन वर्षांपासून आपल्या मुलाचा शोध घेत होते. आदेश परत मिळाल्यावर संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि बाल कल्याण समितीचे आभार मानले.