नववधूने आहेरात मागितला पक्का रस्ता, खासदारांनी महिनाभरात काम करण्याचं दिलं वचन, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:02 PM2022-06-14T16:02:10+5:302022-06-14T16:02:55+5:30
Politics News: एका नवविवाहितेने खासदार महोदयांकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार महोदयांनी एका महिन्यात रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दिलेलं वचन पाळत सदर खासदार महोदयांनी ३५ दिवसांत रस्त्याचं काम पूर्ण केलं.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे खासदारांनी एका नवविहितेला आहेरात दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ही घटना खैर तालुक्यातील कसीसों गावातील आहे. येथे मे महिन्यांत एका नवविवाहितेने खासदार महोदयांकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार महोदयांनी एका महिन्यात रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दिलेलं वचन पाळत सदर खासदार महोदयांनी ३५ दिवसांत रस्त्याचं काम पूर्ण केलं.
मिळालेल्या माहितीनुसार कसीसो गावातील नवीन शर्मा यांचा मुलगा दीपांशू शर्मा याचा विवाह २ मे रोजी हाथरसमधील बमनोई गावातील राहणाऱ्या प्रियंका शर्मा हिच्याशी झाला होता. या लग्नामध्ये खासदार सतीश गौतम यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते कुठल्यातरी कारणामुळे लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, लग्नानंतर ८ मे रोजी खासदार सतीश गौतम हे आशीर्वाद देण्यासाठी नवीन शर्मा यांच्या घरी आले.
त्यावेळी नववधू प्रियंका शर्मा हिने खासदार महोदयांकडे आहेरात पैसे न देता घरापासून शिवमंदिरापर्यंत पक्का रस्ता बांधून देण्याची मागणी केली. त्यानंतर खासदार महोदयांनीही प्रियंकाला पक्का रस्ता बांधून देण्याचं आश्वासन दिलं.
त्यानुसार खासदारांनी ३५ दिवसांमध्ये गावातील शिव मंदिरापासून नवीन शर्मांच्या घरापर्यंत १२० मीटर लांबीचा रस्ता बांधून दिला. १३ जून रोजी रस्ता बांधून पूर्ण झाला. पावसामुळे रस्त्याच्या बांधकामाला ५ दिवस अधिक लागले. खासदारांनी शब्द पाळत रस्ता बांधून दिल्याने प्रियंका हिने खासदार महोदयांचे आभार मानले आहेत.
ग्रामस्थांनी सांगितले की, रस्ता कच्चा असल्याने त्यांना शिवमंदिरापर्यंत जाण्यात अडचणी यायच्या. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येत असे. तर सरपंच नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, हा रस्ता पक्का बांधण्यात यावा अशी मागणी नवीन शर्मा यांनी अनेकदा केली होती. मात्र पुरेसे बजेट नसल्याने ग्रामपंचायत स्तरावरून रस्ता बांधता आला नव्हता.