महाराष्ट्रातील एसटी चालकास मारहाण: वाद निवळला, महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:32 IST2025-02-27T12:32:09+5:302025-02-27T12:32:34+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेली महाराष्ट्रातून कर्नाटकात ...

महाराष्ट्रातील एसटी चालकास मारहाण: वाद निवळला, महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेली महाराष्ट्रातूनकर्नाटकात जाणारी बससेवा बुधवारपासून सुरू झाली असून कोल्हापूर-निपाणी व कोल्हापूर-बेळगाव या दोन बस बुधवारी या मार्गावरून धावल्या.
कर्नाटकातूनही पहिली एसटी बस बुधवारी कोल्हापुरात आली. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेला वाद निवळला आहे. आज गुरुवारपासून कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व मार्गांवरच्या बस सुरळीतपणे धावणार आहेत.
मुंबई-बंगळुरू या एसटी महामंडळाच्या बसला चित्रदुर्ग येथे अडवत कर्नाटकातील संघटनेच्या कार्यकर्त्यांना चालकास कन्नड भाषा येत नसल्याचे कारण देत मारहाण केली होती. याचे तीव्र पडसाद उमटल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूक थांबवण्यात आली. कोल्हापूरसह सीमावर्ती जिल्ह्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या बस महाराष्ट्रात येऊ देणार नसल्याचा इशारा दिला. परिणामी, कर्नाटकनेही त्यांची वाहतूक थांबवली होती.
कोल्हापूर-निपाणी, कोल्हापूर-बेळगाव या बस बुधवारी सोडण्यात आल्या. आज गुरुवारपासून कर्नाटकात जाणाऱ्या विविध मार्गांवरच्या सर्व बस सुरळीतपणे धावतील. - संतोष बोगारे, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर.