मोदींच्या गुजरातेत तहसील कार्यालयालाच केले बस स्थानक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:32 IST2022-12-03T13:31:42+5:302022-12-03T13:32:00+5:30
सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाटळी विधानसभा क्षेत्राचे पाटळी हे मुख्यालय. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानकाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

मोदींच्या गुजरातेत तहसील कार्यालयालाच केले बस स्थानक !
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरेंद्रनगर : निवडणुकीच्या धामधुमीत लोकांचा रोष टाळण्यासाठी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटळी या तालुक्याच्या ठिकाणी चक्क तहसील कार्यालयालाच बस स्थानक बनविण्यात आले आहे. अर्थात लोकांनी आणि एसटी महामंडळानेही ते नाकारले असून, हे बस स्थानक आता नावालाच उरले आहे.
सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाटळी विधानसभा क्षेत्राचे पाटळी हे मुख्यालय. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बसस्थानकाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. गेल्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बस स्थानकाचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी राजकीय पक्षांनी आश्वासन दिले होते. म्हणून नागरिकांचा रोष लक्षात घेता व निवडणुकीत त्याचे नुकसान होऊ नये यासाठी निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीच घाईगर्दीत येथे बस स्थानक बनविण्यात आले. तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधली गेल्याने जुन्या जागेवर हे बस स्थानक झाले आहे. असे बस स्थानक राज्यात दुर्मीळ असल्याने तो शहरात चर्चेचा विषय असल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते भारतसिंग चव्हाण यांनी सांगितले. लोकांची मागणी आणि संताप लक्षात घेता निवडणुकीपूर्वीच तेथील स्थलांतरित झालेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीलाच रंगरंगोटी करून बस स्थानक बनविले होते.