दारू पिऊन बसलात तर कार म्हणेल - 'नो', चंडीगडच्या विद्याथ्यर्थ्याने बनविले सॉफ्टवेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 08:11 AM2024-03-31T08:11:19+5:302024-03-31T08:11:53+5:30
Car Driving: मद्यपान करून वाहन चालवणे हे देशभरातील रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी शेकडो लोकांना जीव गमवावा लागतो. याला आळा घालण्यासाठी चंडीगड विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने एक खास सॉफ्टवेअर तयार केले आहे.
- बलंवत तक्षक
चंडीगड - मद्यपान करून वाहन चालवणे हे देशभरातील रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी शेकडो लोकांना जीव गमवावा लागतो. याला आळा घालण्यासाठी चंडीगड विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने एक खास सॉफ्टवेअर तयार केले आहे. जर तुम्ही मद्यपान करून कारमध्ये बसलात तर हे सॉफ्टवेअर तुमची कार सुरूच होऊ देणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती जागची हलणार नाही.
कारच्या सीटबेल्टमध्ये बसविण्यात येणाऱ्या या सॉफ्टवेअरमध्ये मद्य सेंसर्स आहेत. त्यामुळे त्याला मद्याचा गंध ओळखता येतो. जर तुम्ही मद्यपान करून कारमध्ये बसलात तर त्याला मद्याचा गंध जाणवेल व ते तुमची कार सुरू होऊ देणार नाही. चंडीगड विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी मोहित यादव याने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सीटबेल्टवर सेंसर्स लावले आहेत. सीटबेल्ट लावल्यानंतर सॉफ्टवेअरला चालकाने मद्यपान केले आहे किंवा नाही हे कळेल. जर मद्यपानाची पुष्टी झाली तर ते कार सुरू होऊ देणार नाही. कारच्या मागे-पुढेही सेंसर्स असतील. ते चालकाला सोबत धावत असलेल्या वाहनांचे लोकेशन सांगेल. जर एखाद्या वाहनाची गती वाढली किंवा ते बेकाबू झाले तर अशा धोक्याच्या प्रसंगी तुमच्या गाडीचे आपोआप ब्रेक लागतील. - मोहित यादव, अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी
नितीन गडकरी यांनीही केले कौतुक
- या सॉफ्टवेअरबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मोहितचे कौतुक केले आहे. या सॉफ्टवेअरबाबत मोहितने गडकरींशी यापूर्वी चर्चा केली आहे. सध्या त्याची प्रयोगशाळेत चाचणी सुरू आहे. पहिली चाचणी झाली आहे.
- दुसरी चाचणी यशस्वी झाल्यानंतर, हे सॉफ्टवेअर देशातील सर्व वाहनांत बसवले जाऊ शकते. या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्य म्हणजे ते समोरून येणाऱ्या वाहनांचा वेगही सांगेल. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार, २०२४ सोहळ्यात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते मोहित यादवला गौरविण्यात येणार आहे.