लडाखबाबत केंद्र सरकारने केली मोठी घोषणा, पाच नव्या जिल्ह्यांची केली निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:02 PM2024-08-26T13:02:40+5:302024-08-26T13:04:01+5:30
Five New Districts In Ladakh : केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.
एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार झांस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. झांस्कार आणि द्रास हे नवे जिल्हे कारगिल विभागात असतील. तर शाम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हे लेह विभागात आहेत.
सध्या लडाखमध्ये केवळ लडाख आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर आता लडाखणधील जिल्ह्यांची संख्या वाढून ७ एवढी झाली आहे. लडाख विभागामध्ये अतिरिक्त जिल्ह्यांची मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येत होती. लेह, लडाख आणि कारगिल विभागातील सामाजिक, राजकीय संघटना ह्या नव्या जिल्ह्यांची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्त्वपू्र्ण निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखाडमधील जिल्ह्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. शासकीय व्यवस्था भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा करताना सोशल मीडियावर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेताना केंद्रीय गृहमंत्राने पाच नवे जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच जिल्ह्यांच्या माध्यमातून शासन मजबूत करून लोकांसाठी आणलेल्या योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील.