पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:18 PM2024-08-22T18:18:28+5:302024-08-22T18:18:58+5:30
Noida News: देशभरातून महिला अत्याचाराच्या रोज नवनव्या घटना समोर येत असताना दिल्लीजवळील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देशभरातून महिला अत्याचाराच्या रोज नवनव्या घटना समोर येत असताना दिल्लीजवळील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सेक्टर ९४ मध्ये असलेल्या पोस्टमार्टेम हाऊसमध्ये एक पुरुष आणि एक महिला अश्लिल चाळे करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिसरी व्यक्तीही दिसत आहे. जी हा व्हिडीओ चित्रित करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुमारे २ मिनिटे आणि २१ सेकंदांचा असून, त्यामध्ये दिसत असलेली एक व्यक्ती कॅमेरा ऑन करून पोस्टमार्टेम हाऊसमध्ये पोहोचते. तिथे एक महिला आणि तेथील सफाई कर्मचारी त्याला भेटतात. व्हिडीओ बनवत असलेल्या व्यक्तीला पाहिल्यानंतर ते त्याच्याकडे खाली अंथरण्यासाठी चादरीची मागणी करतात. त्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या खोलील जाऊन चादर घेऊन येते आणि त्यांना देते.
त्यानंतर ही व्यक्ती बाहेर जाते. तर आतमध्ये सफाई कर्मचारी आणि एक महिला अश्लिल चाळे करण्यात गुंग होतात. दरम्यान, व्हिडीओ बनवत असलेली व्यक्ती त्यांना काही तरी सांगते. त्यानंतर ती महिला आणि सफाई कर्मचारी इंटिमेट होण्यास सुरुवात करतात. पोस्टमार्टेम हाऊसमधील ही घटना जिथे चित्रित झाली आहे. तिथे डीप फ्रीजर ठेवलेला आहे. तसेच जिल्ह्यातील बहुतांश मृतदेह सुरक्षित ठेवून येथेच त्यांचं पोस्टमार्टेम करण्यात येतं. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढलेलं आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच बाहेरील महिलेचं पोस्टमार्टेम विभागात येणं हे मृतदेहांसोबत छेडछाड करण्याचं कारण ठरू शकतं, असा संशय व्यक्त केला जात आहे. हा सफाई कर्मचारी काही दिवसांपूर्वीच पोस्टमार्टेम हाऊसमध्ये नियुक्त झाला होता, अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तर या व्हिडीओप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.