खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही तर मोठ्या संकटाची चाहूल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:05 PM2022-05-19T21:05:57+5:302022-05-19T21:09:48+5:30
Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे.
श्रीनगर - मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे. ज्या काश्मिरी पंडितांचं माता खीर भवानी हे कुलदैवत आहे त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिर खोऱ्यामध्ये काही आपत्ती येते तेव्हा जलकुंडाचा रंग बदलल्याने त्याचे संकेत मिळतात. तुलामुला गावात असलेल्या माता खीर भवानीच्या या मंदिराचे जलकुंड हे माता भवानीचेच स्वरूप मानले जाते. तसेच ते आपला रंग बदलून येणाऱ्या स्थितीचे संकेत देत असते.
गेल्या काही दिवसांपासून या जलकुंडाचा रंग लाल झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे येणारे आईचे भक्त चिंतीत आहे. एक महिला भक्त गुडी जुतशी यांनी सांगितले की, येथे १०-१५ दिवस झाले, पण कुंडातील पाण्याचा रंग अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. यापूर्वीही कुंडातील पाण्याचा रंग असाच झाला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. आता पुन्हा असा रंग झाला आहे. असे वाटते की, पुन्हा परिस्थिती बिघडणार आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा कुठलीही आपत्ती येणार असते, तेव्हा या जलकुंडातील पाणी बदलत राहते.
गुडी यांनी सांगितले की, कुंडातील पाण्याचा रंग बदलून तो लालसर झाला आहे. याचा अर्थ काही होणार आहे. रक्तपात होऊ शकतो. कारण जेव्हा पलायन झालं होतं तेव्हा पाण्याचा रंग काळा झाला होता. आमच्यापैकी काहीजण येथून निघून गेले होते. तर अनेक जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर कोरोनामध्येही मोठ्या प्रमामावर हानी झाली होती. आता पुन्हा असं होत आहे. याचा अर्थ जेव्हा राहुल भट्टचा मृत्यू झाला, त्याआधी काही दिवसांपूर्वी या कुंडातील पाण्याचा रंग बदलला होता. नंतर तो लालेलाल झाला. राहुल भट मारला गेला. आता पुढे काही वाईट होऊ नये, अशी अपेक्षा करूया.
या कुंडातील पाण्याचा रंग लाल, पिवळा किंवा काळा होऊ लागतो तेव्हा कुठलीतरी मोठी आपत्ती येईल, अशी श्रद्धा आहे. तर पांढरा, निळा किंवा सौम्य रंगाचे पाणी असेल तर ते शुभ मानले जाते. या कुंडातील पाण्याचा रंग बदलताना पाहिले गेले आहे. विशेषकरून ९० च्या दशकात जेव्हा काश्मीरमधील परिस्थिती बिघडली होती. तेव्हा यातील पाण्याचा रंग हा काळा झाला होता. त्यानंतर काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि हत्या झाल्या होत्या. १९९९ च्या कारगिल युद्धापूर्वी या जलकुंडातील पाण्याचा रंग लाल झाला होता. २०१४ मध्ये पूर येण्यापूर्वी यातील पाण्याचा रंग बदलला होता. तसेच कोविडपूर्वीही या तलावातील पाण्याचा रंग बदलला होता.