आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:10 PM2024-05-29T17:10:51+5:302024-05-29T17:11:42+5:30
Monsoon Update - उष्णतेच्या लाटांनी हैराण नागरिकांना हवामान खात्याच्या नवीन माहितीनं दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली - रखरखतं उन्ह आणि उकाड्याने हैराण नागरिकांना मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्यात हवामान विभागानं आनंदाची बातमी दिली आहे. पुढच्या काही तासात मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो. पुढील २४ तासांत मान्सून केरळात दाखल होईल. पुढील २४ तास म्हणजे ३० मे रोजी मान्सून केरळात धडकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
केरळात यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे. राज्यात मान्सून सर्वसाधारण १ जूनपर्यंत दाखल होतो. यात कधी कधी ३-४ दिवस पुढे किंवा मागे होऊ शकतं. हवामान खात्यानुसार, ३० मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होईल. त्यानंतर राज्यात जोरदार पाऊस पडेल. केरळात आधीच मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र दिसत आहे. केरळात प्री मान्सून लवकरच मान्सून पावसात बदलेल असं IMD नं म्हटलं आहे. IMD नं कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ३ राज्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
The conditions continue to become favourable for Monsoon onset over Kerala during next 24 hours and advance of monsoon over some parts of Northeastern States during the same period. pic.twitter.com/jDnH19EZ3r
— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2024
दक्षिण पश्चिम मान्सून १ जूनच्या आसपास केरळात प्रवेश करतो. त्यानंतर तो उत्तरेच्या दिशेने जातो. १५ जुलैच्या आसपास संपूर्ण देशात पाऊस पडतो. त्याआधी २२ मेपासून अंदमान निकोबार येथे पावसाने धडक दिली आहे. यंदा सामान्यपणे ३ दिवस आधीच म्हणजे १९ मे रोजी अंदमानमध्ये मान्सूनच आगमन झालं आहे.
कोणत्या राज्यात कधी पाऊस येणार?
राज्य | तारीख |
अंदमान निकोबार | २२ मे |
बंगालची खाडी | २६ मे |
केरळ, तामिळनाडू | ३० मे, १ जून |
कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसामच्या काही भागात | ५ जून |
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या वरच्या बाजूस, पश्चिम बंगाल | १० जून |
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहार | १५ जून |
गुजरात, मध्य प्रदेशातील काही भागात, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात | २० जून |
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर | २५ जून |
राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब | ३० जून |
राजस्थान | ५ जुलै |
काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अहवाल दिला होता.या अहवालानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD)परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, हे मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत, असंही हवामान विभागाने म्हटले आहे.