कर्तव्यपथाच्या रूपाने देशाने रचला नवा इतिहास : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 07:30 AM2022-09-09T07:30:13+5:302022-09-09T07:31:05+5:30
दिल्लीतील ‘राजपथाचे’ कर्तव्यपथ असे नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले.
नवी दिल्ली : गुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘राजपथ’ हे नाव अस्तंगत होऊन त्याजागी आता ‘कर्तव्यपथ’ उद्याला आला आहे. कर्तव्यपथाच्या रूपाने भारताने एक नवा इतिहास रचला आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दिल्लीतील ‘राजपथाचे’ कर्तव्यपथ असे नामकरण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. तसेच इंडिया गेटजवळ उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अनावरण केले. त्यावेळी ते म्हणाले की, राजपथाचे कर्तव्यपथात होत असलेल्या रूपांतराचा सोहळा सारा देश पाहत आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतकाळात कर्तव्यपथाचा ऐतिहासिक क्षण अवतरला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस शूर, दूरदर्शी होते. भारत आपला गौरवशाली इतिहास कधीही विसरणार नाही असे ते नेहमी सांगत असत. नेताजींच्या विचारांनुसार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निर्णय घेण्यात आले असते तर देशाने आज नवी उंची गाठली असती; पण त्यांच्या विचारांचे विस्मरण झाले. मात्र, नेताजींच्या विचारांना आदर्श मानून आम्ही गेल्या आठ वर्षांपासून अनेक निर्णय घेतले आहेत. कर्तव्यपथावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले.
सेंट्रल विस्टाचा महत्त्वपूर्ण भाग कर्तव्यपथ
१३,४५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये राजपथाचा पुनर्विकास याही गोष्टीचा अंतर्भाव होता. सेंट्रल विस्टामध्ये संसदेची नवी इमारत, पंतप्रधान, उपराष्ट्रपतींची नवी निवासस्थाने, विविध मंत्रालयांच्या नव्या इमारती बांधण्यात येत आहेत. नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, राष्ट्रपती भवनाच्या बाजूला असलेल्या सचिवालय इमारतींचे रूपांतर वस्तुसंग्रहालयांमध्ये करण्यात येईल. नवी दिल्ली महापालिकेकडून ठराव संमतराजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्याचा ठराव नवी दिल्ली महापालिकेने बुधवारी संमत केला होता. त्यासाठी या महापालिकेची विशेष बैठक आयोजिण्यात आली होती, अशी माहिती लोकसभा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिली.