New Parliament : देशाला मिळणार आज नवी संसद, दीड हजारावर मान्यवरांची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 05:34 AM2023-05-28T05:34:39+5:302023-05-28T05:35:25+5:30

सर्व राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण 

The country will get a new parliament today attendance of over 1500 dignitaries pm narendra modi inaugration | New Parliament : देशाला मिळणार आज नवी संसद, दीड हजारावर मान्यवरांची उपस्थिती 

New Parliament : देशाला मिळणार आज नवी संसद, दीड हजारावर मान्यवरांची उपस्थिती 

googlenewsNext

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : दीड हजारपेक्षा अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होत आहे.  संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व ७७५ खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 

८८८ सदस्यांची आसन व्यवस्था असलेल्या नव्या लोकसभेत हा समारंभ होईल. या सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि राज्यसभेचे उपसभापती हरीवंश उपस्थित राहणार आहेतसर्व देशांचे राजदूत, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह इमारतीच्या बांधकामात योगदान असलेले रतन टाटा, नव्या इमारतीचे वास्तुशिल्पी बिमल पटेल, मान्यवर खेळाडू, चित्रपट कलावंत व विविध क्षेत्रांतील मान्यवरांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाच्या वतीने निमंत्रण पाठविले आहे. या कार्यक्रमात लोकसभाध्यक्षांचे भाषण होईल. पंतप्रधान मोदी यांचेही भाषण होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

राजदंड सुपूर्द
नव्या संसद भवनाच्या रविवारी होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अधिनामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी सेंगोल (राजदंड) सुपूर्द केला. हा सेंगोल नवीन संसद भवनात ठेवला जाणार आहे.

५५० पेक्षा अधिक खासदार अनुपस्थित? 
२१ राजकीय पक्षांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असल्यामुळे ५५० पेक्षा अधिक खासदार उपस्थित राहणार नाहीत, असा अंदाज आहे. रालोआच्या सदस्य पक्षांसह २५ पक्ष कार्यक्रमात सहभागी होतील. 
बसपा प्रमुख मायावती यांनी आपल्या सर्व १० खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, कुंवर दानिश अली यांच्यासह ४ बसपा खासदारांनी कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.

राजदंडवरून टीकेला शाह यांचे सडेतोड उत्तर
नव्या संसदेत बसविण्यात येणार असलेल्या सेंगोलवरूनही (राजदंड) वाद पेटला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी म्हटले होते की, ‘लॉर्ड माउंटबॅटन, सी. राजगोपालचारी अथवा पं. नेहरू यांनी सेंगोलला सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हटल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ त्याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, काँग्रेसने आपल्या वर्तणुकीबाबत चांगल्या प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे. सेंगोलबाबतचे काँग्रेसचे वक्तव्य निंदनीय आहे.

देशाला नवी संसद मिळत असल्यामुळे लोकांच्या मनात अभिमानाचा भाव दाटून आला आहे. नवे संसद भवन लोकांच्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी अधिक जोमाने काम करील. लोकशाहीचे हे मंदिर भारताच्या विकासपथास आणखी मजबूत करत राहो तसेच लाखो लोकांना सबल करत राहो. 
नरेंद्र मोदी, 
पंतप्रधान 

विश्वासात घेतले नाही
संसदेची नवीन वास्तू बांधण्यापासून तिच्या उद्घाटनापर्यंत सत्ताधारी पक्षाने विरोधकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे काही विरोधी पक्षांनी उद्घाटनाला जाऊ नये, अशी भूमिका घेतली. त्याला माझा पाठिंबा आहे. 
शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी 

Web Title: The country will get a new parliament today attendance of over 1500 dignitaries pm narendra modi inaugration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.