कोर्टाने रोखले सरकारचे बुलडोझर; कारवाईला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:46 AM2023-08-08T07:46:10+5:302023-08-08T07:46:19+5:30
उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली दखल; धार्मिक स्थळांना आग लावण्याचा पुन्हा प्रयत्न
नूह (हरयाणा) : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारानंतर पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या बुलडोझर कारवाईला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचा आदेश येताच उपायुक्त धीरेंद्र खरगटा यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना कारवाई करण्यापासून रोखले. सरकारच्या बुलडोझर मोहिमेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया यांनी स्थगिती आदेश दिला.
नूह येथे गेल्या चार दिवसांपासून तोडफोड सुरू होती. यादरम्यान ७५३ हून अधिक घरे, दुकाने, शोरूम, झोपडपट्ट्या, हॉटेल पाडण्यात आली आहेत. ती बेकायदेशीर असल्याचे सांगून प्रशासनाने दावा केला की, त्यात राहणारे लोक ३१ जुलैच्या हिंसाचारात सामील होते.
पुन्हा धार्मिक स्थळाला आग
गुरुग्राममध्ये रविवारी रात्री अज्ञात लोकांनी एका धार्मिक स्थळाला आग लावली. सोमवारी सकाळी याची माहिती मिळाली. लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. सेक्टर ३७ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकांनी आग आटोक्यात आणेपर्यंत काही पूजा साहित्य आगीत जळून खाक झाले होते. या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समाजाचे लोक समाधीवर येतात.
अनेक ठिकाणी कारवाई
नूहमध्ये आतापर्यंत ३७ ठिकाणी प्रशासनाने कारवाई करून ५७.५ एकर जागा मोकळी केली आहे. १६२ कायमस्वरूपी आणि ५९१ तात्पुरती बांधकामे पाडण्यात आली.