७१ वर्षांपूर्वी केला होता गुन्हा; अद्याप निकाल काही लागेना, रखडलेल्या ‘टॉप फाइव्ह’मध्ये महाराष्ट्रातील दोन खटल्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 09:32 AM2023-01-11T09:32:47+5:302023-01-11T09:35:02+5:30
रखडलेल्या ‘टॉप फाइव्ह’मध्ये महाराष्ट्रातील दोन खटल्यांचा समावेश
नवी दिल्ली : न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय, असे म्हटले जाते. असे असले तरी देशातील विविध न्यायालयांत प्रलंबित कोट्यवधी खटल्यांची संख्या पाहता ही समस्या केव्हा सुटणार हाच प्रश्न निर्माण होतो. देशातील सर्वात जुना खटला ७१ वर्षांपासून सुरू आहे, हे सांगितले तर धक्का बसेल. यातील सर्वात जुन्या पाच खटल्यांपैकी दोन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आहेत.
एका अहवालानुसार, देशातील सर्वात जुना प्रलंबित गुन्हेगारी खटल्यात महाराष्ट्रातील रायगड येथे १८ मे १९५३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणखी एक विशेष आकडेवारी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या २७ न्यायाधीशांपैकी तेव्हा कोणीही जन्माला आलेले नव्हते. सध्या न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यांचा जन्म १५ मे १९५८ रोजी झाला.
सर्वात जुने काही खटले असे...
६९ वर्षांपूर्वीचा अमलीपदार्थ बाळगल्याचा गुन्हा महाराष्ट्रातील रायगड येथे पोलिसांनी १८ मे १९५३ रोजी अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याच वर्षी, रायगडच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९च्या कलम ६५-ई अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आता हे प्रकरण ९ फेब्रुवारी २३ रोजी सुनावणीसाठी सूचिबद्ध केले आहे.
६६ वर्षांपूर्वीचा चोरीचा खटला
आणखी एक जुना खटलाही महाराष्ट्रातील रायगड येथील आहे. २५ मे १९५६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. चोरी केल्याप्रकरणी कलम ३८१ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण अद्याप प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे.
सर्वात जुना दिवाणी खटला कुठे?
कोलकाता उच्च न्यायालयातील रेकॉर्डवरील सर्वात जुना दिवाणी खटला १९५१चा आहे आणि १९६९नंतरच्या सर्वात जुन्या फौजदारी खटल्यात निकालाची प्रतीक्षा आहे.
मालमत्ता वादाची ७० वर्षे
प. बंगालमधील मालदा जिल्ह्यात ३ एप्रिल १९५२ रोजी दाखल केलेल्या मालमत्ता वादाच्या फौजदारी खटल्याचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या विभाजनाचे हे प्रकरण होते.