"कोकीळ अन् कावळा एकाच रंगाचे पण...", संस्कृत सुभाषितानं युक्तिवादाचा शेवट; कामत म्हणाले, खरी शिवसेना कोण ते...
By मोरेश्वर येरम | Published: March 16, 2023 05:30 PM2023-03-16T17:30:48+5:302023-03-16T17:32:41+5:30
सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे.
नवी दिल्ली-
सुप्रीम कोर्टात गेल्या ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी अखेर आज पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून खंडपीठानं निकाल राखून ठेवला आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या राजकीय महानाट्यात अखेर कुणाच्या बाजूनं निकाल लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू खंडपीठासमोर मांडताना जोरदार आणि सडेतोड युक्तिवाद केला आहे.
न्यायालयानं आज ठाकरे गटाच्या वकिलांना रिजॉइंडरसाठी वेळ दिला होता. यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांना याआधीच्या युक्तिवादात राहून गेलेले मुद्दे मांडण्याची संधी मिळाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्या युक्तिवादानं याचिकेची सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कामत यांनी संस्कृत सुभाषिताचा दाखला देत आपला युक्तिवाद पूर्ण केला.
"कोकीळ आणि कावळा हे दोघेही एकाच रंगाचे.. कधी कधी कावळा पण कोकीळ असल्याचं नाटक करतो. पण जेव्हा पहाट होते तेव्हा पितळ उघडं पडतं...कोकीळ गाते आणि कावळा काव काव करतो. इथे शिवसेना कोण? खरी शिवसेना कोण हे निकालाच्या वेळी स्पष्ट होईल", असं देवदत्त कामत म्हणाले आणि त्यांनी आपला युक्तिवाद संपल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
“शिंदे गटाला सरकार पाडायचं होतं पण आमदारकी घालवायची नव्हती”; कपिल सिब्बलांचे वर्मावर बोट
दोन्ही पक्षकारांना पुरेसा वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज सर्वांचं अभिनंदन केलं. तसंच कोर्टरुममधील ज्युनिअर सहकारांचंही अभिनंदन केलं आणि सुनावणी पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. कोर्टानं याप्रकरणाचा निकाल आता राखून ठेवला आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
देवदत्त कामत यांनी यावेळी एक महत्वाची गोष्ट खंडपीठाला लक्षात आणून दिली. पक्षात फूट पडल्याचा दावा आम्ही केलेला नाही असं वारंवार शिंदे गटाच्या वकिलांकडून म्हटलं जात आहे. पण निवडणूक आयोगानं दिलेला निकाल एकदा वाचा त्यांनी पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचा उल्लेख करत निकाल दिला आहे. शिवसेनेत फूट पडल्याचा पुरावा असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यांच्या लेखी निवेदनात फूट पडल्याचं नमूद आहे, असं कामत म्हणाले.
पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान
राजकीय पक्ष ही काही अनिश्चित संकल्पना नाही. राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारे अनेक गट असू शकतात. पण २१ जूनला एकच पक्ष होता ज्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत होते, असंही देवदत्त कामत म्हणाले.