नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:56 AM2024-10-08T10:56:35+5:302024-10-08T10:57:23+5:30

सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

the days of job cuts are over good days in tech companies after almost 18 months | नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात तब्बल १२ ते १८ महिन्यांपासून ठप्प झालेली कर्मचारी भरती आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील सुमारे दीड वर्षाच्या काळात कर्मचारी भरतीला तर ‘ब्रेक’ लागलेला होताच, पण मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात होती. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. मात्र, या क्षेत्राचे दुर्दशेचे दशावतार आता संपत आल्याचे संकेत मिळत आहेत.

आघाडीची भरती संस्था ‘एक्सफेनो’च्या आकडेवारीनुसार, भरतीतील सुधारणेत अजून स्थैर्य स्पष्टपणे दिसत नसले तरी काही चांगले संकेत मिळत आहेत. वित्त वर्ष २०२५ मधील पहिल्या ५ महिन्यांत आयटी क्षेत्रातील सेवा व उत्पादने तसेच स्टार्टअप क्षेत्रांतील भरतीत धीमी वाढ दिसून येत आहे.
एक्सफेनोचे सहसंस्थापक अनिल एथनुर यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील अडथळ्यांमुळे आयटी कंपन्यांना खर्चात कपात करावी लागली होती. त्याचा थेट परिणाम भरतीवर झाला होता.

नोकरी विषयक सल्लागार हितेश ओबेरॉय यांनी सांगितले की, आता आयटी कंपन्यांत सर्व पातळ्यांवर भरती दिसून येत आहे. कॅम्पस भरतीही वाढत आहे. मागील काही महिन्यांत आयटी कंपन्यांनी मोठ्या संख्येने भरती केली आहे. मागील २ ते ४ तिमाहींच्या तुलनेत भरतीत वाढ झाली आहे. नाेकर भरतीतील वाढीसोबतच नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढेल 
तसेच वेतनातही वाढ होईल, असे अपेक्षित आहे.

८५ टक्के कर्मचाऱ्यांची  मागणी ही टीयर १ शहरांमध्येच सध्या आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत मे २०२४ च्या तुलनेत फक्त २५ टक्केच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उच्चांकी मागणीच्या तुलनेत तर ती अजूनही ५० टक्के कमी आहे.

स्टार्टअप्समध्येही लागणार मनुष्यबळ

- भारतातील स्टार्टअप्सनी सुमारे ३० हजार लाेकांना कामावरुन काढले हाेते. मात्र, आता या क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. कंपन्यांना ४०-५० टक्के वाढ हवी आहे. 

- मात्र, मनुष्यबळाशिवाय ते साध्य हाेणार नाही. फार माेठी नाही, परंतु काही प्रमाणात या स्टार्टअप्समध्ये नाेकर भरती सुरू हाेईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title: the days of job cuts are over good days in tech companies after almost 18 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी