चक्क मृतांनी रुग्णालयांत जाऊन घेतले उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:49 AM2023-08-12T06:49:14+5:302023-08-12T06:49:22+5:30

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : एखादी मृत व्यक्ती रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकते काय? इतर ठिकाणचे माहीत ...

The dead went to the hospital and received treatment! | चक्क मृतांनी रुग्णालयांत जाऊन घेतले उपचार!

चक्क मृतांनी रुग्णालयांत जाऊन घेतले उपचार!

googlenewsNext

- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : एखादी मृत व्यक्ती रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकते काय? इतर ठिकाणचे माहीत नाही पण हरयाणाचे म्हणाल तर तेथे हे शक्य आहे. राज्यातील काही मृतांनी चक्क रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. हा चमत्कार इथेच थांबत नाही तर तब्बल १४२१ रुग्णांनी (मृतांसह) एकाच दिवशी अनेक रुग्णालयांत उपचार घेतले. खोटी बिले उचलण्यासाठी आयुष्मान भारत योजनेत ही खाबूगिरी करण्यात आल्याचे महालेखापालांच्या (कॅग) अहवालातून समोर आले. आयुष्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वैद्यकीय उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.

कॅगच्या अहवालात हरयाणातील वैद्यकीय घोटाळ्याचा पर्दाफाश करताना आयुष्मान भारत योजनेतील अनेक त्रुटींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. २०१८ ते २०२१ दरम्यानचा हा अहवाल संसदेत मांडण्यात आला. मृतांना जिवंत दाखवून बिले उचलण्यात  आली. या बोगसगिरीत १३४ रुग्णालयांचा सहभाग असून, प्रशासनातील मंडळी आणि रुग्णालयांनी संगनमताने हा घोटाळा केला,  असे या अहवालात म्हटले आहे. 

कॅगने ज्या आकडेवारीचे विश्लेषण केले. त्यात पुरुष व गर्भवती महिलांशिवाय अन्य महिलांचाही समावेश आहे. अशा प्रकरणांत महिलेच्या प्रसूतीनंतर आईच्या आयुष्मान आयडीवर बाळांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे राष्ट्रीय आरोग्य  प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. परंतु, कॅगने हा दावा फेटाळून लावला आहे.

अन् ३५४ मृत झाले जिवंत...
११४ अर्धवट कार्डवरही आठ लाखांची रक्कम जारी करण्यात आली. निवृत्तिवेतनधारकांनाही या योजनेत सहभागी करून घेता येत  नाही.  मात्र, त्यांनाही कार्ड जारी करून त्यांच्यावरील उपचारापोटी रुग्णालयांना २६ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर ३५४ मृतांना जिवंत दाखवून त्यांच्यावरील उपचाराच्या नावाखाली ५४ लाख रुपये उचलण्यात आले.
 

Web Title: The dead went to the hospital and received treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.