भाऊबीजेदिवशीच भाऊ-बहिणीसह आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 11:25 PM2023-11-15T23:25:34+5:302023-11-15T23:26:25+5:30
Accident: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथे दुचाकी आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भाऊ-बहिणीसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथे दुचाकी आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भाऊ-बहिणीसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. अपघातात मृत्यू झालेले तिघेही भाऊबीज साजरी करण्यासाठी जात होते.
हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये दुचाकीवरून जात असलेली आई आणि मुलगी २० फूट दूर अंतरावर जाऊन पडली. अपघातानंतर पादचारी आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना सूचना दिली आहे. ते आल्यानंतर मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यात येईल.
रामगंजमंडी येथील पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, हा अपघात उंडवा रोड रावली पंपाजवळ घडला. तिथे एका दुचाकीवर तीन जण स्वार होऊन रामगंजच्या दिशेने येत होते. यामध्ये भाऊ-बहीण आणि त्यांची आई होती. त्याचदरम्यान मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओसोबत या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये दुचाकीस्वार हितेश मेवाडा याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची बहीण पूजा आणि आई कमलेश बाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर रामगंजमंडी सीएचसी येथे नेण्यात आले. तिथे या दोघींचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी स्कॉर्पिओचालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये स्कॉर्पियोमधून जात असलेली एक महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रामगंज मंडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.