कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखीच राम मंदिराची रचना! मूर्तीवर रामनवमीला सूर्य किरणे पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:01 PM2024-01-22T18:01:18+5:302024-01-22T18:04:11+5:30
अयोध्येत भव्य राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला आहे. या मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे. हे मंदिर भव्यच नाही तर या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अयोध्येच्या मंदिराच्या खास वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली. 'अयोध्याराम मंदिरात एक विशेष सूर्य टिळक तंत्र आहे, ज्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की दरवर्षी श्री राम नवमीच्या दिवशी दुपारी सूर्याची किरणे मूर्तीच्या कपाळावर पडतील. ही किरणे सुमारे ६ मिनिटे प्रभू रामाची मूर्तीवर पडतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. अशीच सूर्याची किरणे महाराष्ट्रातील कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील मूर्तीवर पडतात.
राम मंदिर बांधणाऱ्या हातांचाही सन्मान; PM मोदींची मजुरांवर पुष्पवृष्टी, योगदानाचे कौतुक
रामनवमी मार्च-एप्रिलमध्ये हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते, भगवान विष्णूचा सातवा अवतार, भगवान राम यांचा हा जन्मदिन असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बेंगळुरू येथील भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्थेने हे विशेष डिझाइन तयार करण्यात मदत केली आहे. "गिअरबॉक्स आणि रिफ्लेक्टिव्ह लेन्स अशा प्रकारे मांडण्यात आले आहेत की स्पायरजवळील तिसऱ्या मजल्यावरून येणारी सूर्यकिरण थेट गर्भगृहात पडतील.
दरवर्षी अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही अशीच सूर्यकिरण मूर्तीवर वर्षातून एकदा पडतात. नोव्हेंबर महिन्यातील ९ ते १३ तारखेदरम्यान आणि ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा होतो. यात पहिल्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात. दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर किरणे येतात. चौथ्या व पाचव्या दिवशी किरणांचा परतीचा प्रवास होतो.
आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा विधी झाला. गर्भगृहात नरेंद्र मोदींनी पंडितांच्या मंत्रोच्चारात विधी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनीही या विधीत सहभाग घेतला होता. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
यावेळी लष्कराच्या हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात पुष्पवृष्टी केली. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अयोध्या धाममध्ये श्री रामललाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांना भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणे मला खूप आनंददायी आहे. जय सियाराम, असं म्हटले आहे.