‘जिल्हा न्यायाधीशांनी मला रात्री भेटायला बोलाविले’; महिला न्यायाधीशांनी मागितला इच्छामृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 05:33 AM2023-12-16T05:33:27+5:302023-12-16T05:33:48+5:30
सरन्यायाधीशांनी मागविला अहवाल
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका महिला न्यायाधीशांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून जिल्हा न्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तसेच, या महिला न्यायाधीशांनी सन्मानाने जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे. त्यानंतर सरन्यायाधीशांनी अलाहाबाद उच्च न्यायालय प्रशासनाकडून चौकशीच्या स्थितीवर अहवाल मागविला आहे.
या महिला न्यायाधीशांनी दोन पानांचे पत्र सरन्यायाधीशांना लिहिले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. बाराबंकी येथे कार्यरत असताना जिल्हा न्यायमूर्तींनी गैरवर्तन आणि छळ केल्याचा आरोप महिला न्यायाधीशांनी केला आहे. आपल्याला जीवन संपविण्याची परवानगी द्यावी, सरन्यायाधीशांच्या आदेशानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे अहवाल मागविला आहे.
पत्रात काय लिहिले?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रात म्हटले आहे की, मला जिल्हा न्यायाधीशांनी रात्री बाेलाविले. मला आता जगण्याची इच्छा नाही. गेल्या दीड वर्षात मी जिवंतपणी मरणयातना भोगत आहे. या निष्प्राण आणि निर्जीव शरीराला यापुढे घेऊन जाण्याचा हेतू राहिला नाही. माझे जीवन सन्मानाने संपविण्याची परवानगी दिली जावी.