व्हॉट्सॲप कॉलच्या मदतीने डॉक्टरांनी केली डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:12 AM2023-02-13T11:12:34+5:302023-02-13T11:13:15+5:30
क्रालपोरा उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ यांनी केरण आरोग्य केंद्रातील डॉ. अर्शद सोफी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे प्रसूतीची प्रक्रिया समजावून सांगितली.
श्रीनगर : हिमवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या दुर्गम केरनमध्ये प्रसूतीशी गुंतागुंत झालेल्या गर्भवती महिलेसाठी डॉक्टरांनी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मदत केली. त्यामुळे निरोगी बाळ जन्माला येण्यास मदत झाली.
क्रालपोरा येथील ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. मीर मोहम्मद शफी यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री केरन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसूतीसाठी एक महिला आली होती, तिच्यामध्ये यापूर्वी प्रसूती करताना मोठी गुंतागुंत झाली होती. बर्फवृष्टीमुळे केरन कुपवाडा जिल्ह्याच्या उर्वरित भागापासून तुटलेला असल्याने महिलेला हवाई मार्गाने नेण्याची गरज होती. सततच्या हिमवृष्टीमुळे हवाई प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रसूतीमध्ये मदत करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास भाग पाडले.
क्रालपोरा उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ यांनी केरण आरोग्य केंद्रातील डॉ. अर्शद सोफी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हॉट्सॲप कॉलद्वारे प्रसूतीची प्रक्रिया समजावून सांगितली. डॉक्टर शफी म्हणाले की, महिलेला प्रसूतीसाठी प्रवृत्त केले गेले आणि सहा तासांनंतर एक निरोगी मुलगी जन्माला आली. सध्या मुलगी आणि आई दोघेही निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे.