ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:50 IST2024-12-18T11:48:28+5:302024-12-18T11:50:19+5:30
सॅटेलाइट फोटोंवरून खुलासा झाला आहे की, चीनने गेल्या आठ वर्षांमध्ये भूतानच्या या पारंपरिक भागात किमान 22 गावे आणि वस्त्या वसवल्या आहेत.

ड्रॅगनची शेपटी वाकडी ती...; चीनचं भूतानच्या डोकलामजवळ मोठं कृत्य, भारताचं टेन्शन वाढवलं!
लडाखच्या पूर्व भागातील भारत आणि चीनचे सैन्य माघारी घेण्यासंदर्भातील करारानंतर, द्विपक्षीय संबंध पुनर्स्थापित करण्यासंदर्भात बुधवारी (28 डिसेंबर 2024) एक बैठक पार पडली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ड्रॅगनची शेपटी वाकडी ती वाकडीच आहे. तो डोकलाम परिसरात गावे वसवत आहे. हा भू-भाग पारंपरिकदृष्ट्या भूतानचा आहे.
डोकलाम भागात 22 गावं वसवली -
सॅटेलाइट फोटोंवरून खुलासा झाला आहे की, चीनने गेल्या आठ वर्षांमध्ये भूतानच्या या पारंपरिक भागात किमान 22 गावे आणि वस्त्या वसवल्या आहेत. तसेच डोकलामच्या जवळपास गावे वसवण्याचे काम वर्ष 2020 पासून सुरू आहे. येथे आतापर्यंत 8 गावे वसवण्यात आली आहेत. भूतानच्या पश्चिमी भागात वसवली गेलेली ही गावे रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. ही गावे एक खोऱ्याला लागून आहेत. ज्यांवर चीन आपला अधिकार असल्याचे सांगतो. येथून चीनच्या सैन्य छावण्या अत्यंत जवळ आहेत.
भारताचं टेन्शन वाढवलं -
चीनने जी 22 गावे वसवली आहेत, त्यांतीस सर्वात मोठे जे गाव आहे, त्याचे नाव आहे जीवू. जे पारंपरिक भूतानी चरागाह त्सेथांखखावर वसवण्यात आले आहे. चीनच्या या कृत्याने भारताचे टेन्शन वाढवले आहे. या भागात चीनची स्थिती मजबूत झाल्याने सिलीगुडी कॉरिडोरच्या (ज्याला चिकन नेकही म्हटले जाते) सुरक्षिततेला धोकाही निर्माण झाला आहे. हा कॉरिडोर भारताला इशान्य राज्यांसोबत जोडतो.
डोकलाम भागात 2017 मध्ये हस्तक्षेप करून भारताने तेथे रस्ते आणि इतर सुविधांचे बांधकाम थांबवले होते. यामुळे भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यांत 73 दिवस संघर्ष सुरू होता. अखेरीस दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली. आता गेल्या काही वर्षांपासून चीनने पुन्हा एकदा डोकलामच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये बांधकामे वाढवली आहेत. मात्र, अलिकडच्या वर्षांतच, भूतानच्या अधिकाऱ्यांनी भूतानच्या भूभागात चिनी वसाहतींचे अस्तित्व नाकारले होते.