ड्रॅगनचे शेपूट वाकडेच! चीनने LAC वर हॅलिपॅड, रस्त्यांचे विणले जाळे, धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 04:45 PM2023-10-22T16:45:15+5:302023-10-22T16:45:46+5:30
India-China LAC: गलवानमधील संघर्षापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणलेले आहेत. मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अ
गलवानमधील संघर्षापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणलेले आहेत. मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेटागॉनच्या एका अहवालातून काही धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. या अहवालातील माहितीनुसार चीनने भारताला लागून असलेल्या एलएसीवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम करत आहे. तसेच या भागात चीनने आपल्या सैन्याची गस्तही वाढवली आहे.
या रिपोर्टनुसार भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान, चीनने डोकलामजवळ नवे रस्ते, बंकर, पँगाँग सरोवराजवळ एक दुसरा पूल आणि एलएसीजवळ दुहेरी उद्देश असलेला एक विमानतळ आणि अनेक हेलिपॅड तयार केले आहेत.
भारत आणि चिनी सैनिकांदरम्यान गेल्या तीन वर्षांपासून लडाखमध्ये तणावाचं वातावरण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर काही क्षेत्रातून सैन्य माघारी परतल्या आहेत. या दरम्यान, पेंटॅगॉनने मिलिट्री अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या नावाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
पेंटॅगॉनच्या या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमा निश्चिती करण्यासंदर्भात भारत आणि चीन यांच्यात असलेले वेगवेगळे दावे आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे संघर्ष झाला आहे. त्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे. दोन्हीकडून सीमेवर लष्कर तैनात आहे. २०२२ मध्येही चीनने एलएसीवर पायाभूत सुविधांचं बांधकाम सुरूच ठेवलं आहे.