आई होण्याचे स्वप्न लहान वयातच भंग पावतेय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:55 AM2023-04-14T06:55:43+5:302023-04-14T06:55:48+5:30
साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते.
नवी दिल्ली :
साधारणपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती (मासिक पाळी कायमची बंदी होणे) सुरू होते. मात्र, बदलती दिनचर्या, रोजचा आहार, मद्यपान, बिघडलेली हार्मोनची स्थिती, उशिरा लग्न करणे यामुळे सध्या महिलांना ३० ते ३५ वयातच स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ३५ पेक्षा अधिक वय असतानाही आई होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या अहवालानुसार, २०१६ मध्ये रजोनिवृत्तीचे प्रमाण १.५% होते २०२१-२०२२ मध्ये वाढ होत २.१% झाले आहे.
जीवनशैलीतील बदल ठरतोय धोक्याचा
महिला डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतर दर महिन्याला ३ ते ४ केसेस येत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानमध्ये रजोनिवृत्तीच्या समस्या येत आहेत.
मुंबईमध्येही अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महिलांच्या जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम मासिक पाळीवर होत आहे.
कोणता हार्मोन धोकादायक?
बहुतेक महिलांमध्ये अँटी म्युलेरियन हार्मोन (एएमएच) पातळी १ एनजी/ एमएलपेक्षा कमी असते. यामुळे गर्भधारणेतील समस्या व्यतिरिक्त वयाच्या आधी मासिक पाळी बंद होते. धूम्रपान व अल्कोहोलमुळेदेखील हार्मोनल असंतुलन होत या समस्या उद्भवतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मेट्रो शहरातील बहुतांश तरुण-तरुणी उशिरा लग्न करतात. याचा परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो आणि वंध्यत्वाचे प्रमाण वाढू लागते.
- डॉ. शालिनी राठोड, स्त्रीरोगतज्ज्ञ
लक्षणे काय?
कमी झोप, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, लघवी संसर्ग, अचानक घाम येणे, चिडचिड, नैराश्य, राग-मूड बदलणे, अनियमित मासिक पाळी येणे, सेक्स करण्याची इच्छा कमी होणे, लघवीवरील नियंत्रण कमी होणे ही रजोनिवृत्ती येण्याची लक्षणे आहेत.
काय कराल?
रजोनिवृत्ती दरम्यान जास्तीत जास्त वेळ सैल कपडे घाला. वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योगासने, व्यायाम, सकस आहार, भरपूर पाणी प्या, तळलेल्या आणि गरम अन्नापासून दूर राहा.