रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:06 PM2024-10-07T17:06:03+5:302024-10-07T17:06:37+5:30
Gujarat Bus Accident: अपघाताबाबत बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरने मद्यपान केले होते. तसेच तो धावत्या बसमध्ये रिल बनवत होता. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला.
गुजरातमधील बनासकांठा येथे झालेल्या एका भीषण अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर २५ हून अधिक प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवासी हे नवरात्रीनिमित्त दर्शनाला गेले होते. तिथून परतत असताना त्रिशुलिया येथील घाटरस्त्यामध्ये बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. अपघागग्रस्त बस सुरुवातीला एका विजेच्या खांबावर आदळली. त्यानंतर रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. या बसमधून ६० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, आता या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अपघाताबाबत बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरने मद्यपान केले होते. तसेच तो धावत्या बसमध्ये रिल बनवत होता. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
अपपघातग्रस्त बसमधील बहुतांश प्रवासी हे खेडा जिल्ह्यातील कठलाल गावातील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच जवळच्या गावातील लोकांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच जखमींना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आता या अपघाताचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रवाशांनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच फरार ड्रायव्हरचा शोध सुरू आहे.