Railway: झोप पूर्ण न झाल्यानं रेल्वे चालवण्यास चालकाचा नकार; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:11 PM2022-01-22T16:11:02+5:302022-01-22T16:11:20+5:30
बालामऊ पॅसेंजर ट्रेन मोटरमननं झोप पूर्ण न झाल्याचं कारण देत चालवण्यापासून नकार दिला
शाहजहाँपूर – वाहन चालवताना कधी चालकाला झोप आली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा चालक झोप आली असेल तर गाडी बाजूला घेऊन काही वेळ आराम करतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का ट्रेन चालकाला झोप आली म्हणून ट्रेन एकाच ठिकाणी थांबली आहे? नाही ना, पण हे झालंय. उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी अजब गजब प्रकार पाहायला मिळाला.
याठिकाणी बालामऊ पॅसेंजर ट्रेन मोटरमननं झोप पूर्ण न झाल्याचं कारण देत चालवण्यापासून नकार दिला. त्यामुळे तब्बल अडीच तास ट्रेन स्टेशनवरच ताटकळत होती. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. बालामऊ पॅसेंजर गुरुवारी साडे तीन तासाच्या लेटमार्कनं रात्री एकच्या सुमारास शाहजहाँपूर रेल्वे स्टेशनला पोहचली. बालामऊहून जो ड्रायव्हर ट्रेन घेऊन आला होता. त्यालाच पहाटे पुन्हा बालामऊला ट्रेन घेऊन जायची होती. परंतु रात्री उशीरा आल्यामुळे चालकाची झोप पूर्ण झाली नाही.
शुक्रवारी सकाळी ट्रेनची वेळ झाली तरी चालक हजर नव्हता. त्याने झोप पूर्ण न झाल्याने ट्रेन घेऊन जाण्यास नकार दिला. जोपर्यंत झोप पूर्ण होत नाही तोवर ट्रेन चालवू शकत नाही. झोप पूर्ण झाल्यावर ट्रेन घेऊन जातो असं तो म्हणाला. ही ट्रेन सकाळी ७ वाजता पुन्हा बालामऊच्य परतीच्या प्रवासाला जाणार होती. परंतु चालकाची झोप पूर्ण होईपर्यंत तब्बल ९.३० वाजेपर्यंत ही ट्रेन शाहजहाँपूर स्टेशनवरच थांबली होती. चालकाची झोप पूर्ण झाल्यावर तो ट्रेन चालवण्यासाठी आला. त्याने रोजापर्यंत ट्रेन चालवली त्यानंतर दुसऱ्या चालकाने रोजा ते बालामऊ असा प्रवास केला.
शाहजहाँपूर स्टेशन मास्टर जे पी सिंह म्हणाले की, लोको पायलट बालामऊहून ही ट्रेन रोजापर्यंत आणतात. रोजामध्ये रात्री आराम करुन सकाळी लोको पायलट ट्रेन पुन्हा घेऊन जातात. परंतु रात्री झोप पूर्ण न झाल्याने चालकाने सकाळी ट्रेन घेऊन जाण्यास नकार दिला. त्यानंतर त्याची झोप पूर्ण झाली आणि तो ट्रेन घेऊन रवाना झाला. मात्र घडलेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.