वाहन धडकण्याआधीच चालकाला कळणार; अपघात टळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:21 AM2023-11-12T09:21:31+5:302023-11-12T09:22:04+5:30
मंत्रालयाने या संदर्भातील मसुद्यात ऑटोमोबाइल उद्योगांसाठी एमओआयएसची मानके निश्चित केली आहेत.
नवी दिल्ली : अनेकदा वाहन चालवत असताना ब्रेक न लागणे किंवा अन्य कारणांमुळे वाहन पुढील वाहनांना, पादचारी आणि सायकलस्वार यांच्यावर आदळते. यामुळे लाखो जणांचा दरवर्षी मृत्यू होतो. त्यामुळे आता वाहन टक्कर देण्याआधीच नियंत्रित होणार असून, अपघात टळणार आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी चारचाकी, प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये ‘मूव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम’ (एमओआयएस) प्रणाली लावण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ही यंत्रणा टक्कर होण्याआधीच इशारा देईल. मंत्रालयाने या संदर्भातील मसुद्यात ऑटोमोबाइल उद्योगांसाठी एमओआयएसची मानके निश्चित केली आहेत.
प्रत्येक तासाला १९ नागरिकांचा मृत्यू
२०२२ मध्ये भारतात रस्ते अपघातांची संख्या २०२१ च्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून ४.६ लाखांवर पोहोचली आहे. यात प्रत्येक तासाला १९ नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे रस्ते मंत्रालयाच्या या प्रस्तावाला महत्त्व निर्माण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०२४ पर्यंत देशातील अपघात आणि मृत्यूची संख्या निम्मी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.