दगडी भिंतीला हवा जागतिक दर्जा, वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठी बिहार सरकारचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:28 AM2022-04-16T06:28:11+5:302022-04-16T06:28:33+5:30
बिहारमधील राजगीर या प्राचीन नगरीच्या सुरक्षेसाठी तिच्या भोवती अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी ४० किमी लांबीची दगडी भिंत बांधली होती.
पाटणा :
बिहारमधील राजगीर या प्राचीन नगरीच्या सुरक्षेसाठी तिच्या भोवती अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी ४० किमी लांबीची दगडी भिंत बांधली होती. जगात अस्तित्वात असलेल्या अतिप्राचीन बांधकामांमध्ये तिचा समावेश होतो. युनेस्कोकडून या भिंतीला जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून बिहारच्या सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
यासाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने युनेस्कोकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी बिहार सरकारने केली आहे. व तसा एक प्रस्ताव नव्याने एएसआयला पाठविला आहे. भिंत ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात बांधली आहे.
आक्रमकांना रोखण्यासाठी
- आक्रमकांना रोखण्यासाठी रोमन साम्राज्याच्या सीमेवर कॉमन एराच्या (सीई) दुसऱ्या शतकातही भिंत बांधण्यात आली.
- तिचा समावेश युनेस्को जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत १९८७ साली करण्यात आला.
- रोमन साम्राज्याभोवती बांधलेल्या भिंतीसारखीच बिहारमधील राजगीरच्या भिंतीची रचना असल्याचे सांगण्यात येते.
- चीनची भिंत जशी जगप्रसिद्ध आहे तसेच स्थान बिहारच्या भिंतीलाही मिळावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.
राज्यातील प्राचीन वास्तूंपैकी राजगीरची दगडी भिंत महत्त्वाची आहे. जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत या भिंतीला स्थान मिळाल्यास जगभरातले पर्यटक पाहण्यासाठी येतील.
- नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार