भारतीय पर्यटकांचा उत्साह शिगेला, विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:52 AM2022-09-23T06:52:41+5:302022-09-23T06:53:00+5:30
तिकीट भाडे वाढले तरी विमान, हॉटेलचे सर्चिंग दुपटीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात यंदा हवाई प्रवासाच्या भाड्यात मोठी वाढ झाली असली तरी विमान उड्डाणे आणि हॉटेल यांच्या सर्चमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या सणासुदीच्या हंगामात यंदा देशांतर्गत हवाई प्रवासाचे भाडे ३९ टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाचे भाडे ३८ टक्क्यांनी वाढले आहे. असे असले तरी १ जुलै ते २० ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत यंदा विमान उड्डाणांच्या सर्चमध्ये ११८ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या सर्चमध्ये १४३ टक्के, तर देशांतर्गत उड्डणांच्या सर्चमध्ये ९१ टक्के वाढ झाली आहे. हॉटेलांच्या सर्चमध्ये एकूण ३४ टक्के वाढ झाली आहे. देशांतर्ग हॉटेलांच्या शोधातील वाढ ९८ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाचे सर्च इंजिन कायकच्या अहवालानुसार, सणासुदीच्या हंगामात हवाई भाड्यात ६२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तथापि, ही वाढ भारतीय पर्यटकांचा उत्साह कमी करू शकलेली नाही.
सर्वाधिक सर्च झालेली देशांतर्गत ठिकाणे :
दिल्ली, मुंबई, गोवा, चेन्नई, कोची, हैदराबाद आणि अहमदाबाद.
सर्वाधिक सर्च झालेली विदेशी ठिकाणे :
दुबई, बँकॉक, लंडन आणि सिंगापूर.
या देशांतील नागरिकांनी भारतासाठी केले सर्वाधिक सर्च : अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर, सौदी अरब.