कसे साकारले श्रीराम मंदिर?, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराचा पाहा, संपूर्ण इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:48 AM2024-01-21T08:48:38+5:302024-01-21T08:48:45+5:30
प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने उभारले पहिले राम मंदिर
अयोध्येतील भगवान श्रीरामजन्मभूमी मंदिराचा संपूर्ण इतिहास मोठा आहे. प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने पहिले मंदिर उभारल्याचा उल्लेख पाैराणिक ग्रंथात आढळताे. त्याशिवाय महाराजा विक्रमादित्य यांनी दुसऱ्यांदा श्रीराम मंदिर बांधले हाेते. त्यानंतर शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांनी रामजन्मभूमीला भेट दिल्याचा उल्लेख गुरू ग्रंथसाहिबमध्ये आहे. न्यायालयात हा एक पुरावा मानला गेला. या संदर्भातील घडामाेडींवर एक नजर...
प्रभू श्रीरामांचा पुत्र कुश याने उभारले पहिले राम मंदिर
पौराणिक कथा आणि धार्मिक ग्रंथांवर आधारित पारंपरिक माहितीनुसार, प्रभू श्रीराम जेव्हा प्रजेसह वैकुंठाला गेले तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरी शरयूमध्ये लीन झाली. केवळ अयोध्येची भूमी वाचली आणि ही भूमी वर्षानुवर्षे तशीच पडून राहिली. पुढे कौशांबीचे महाराज कुश यांनी अयोध्येची पुनर्स्थापना केली. त्याचे वर्णन कालिदासांच्या ‘रघुवंश’ या ग्रंथात आढळते. लोमश रामायणानुसार, त्यांनी आपल्या वडिलांच्या पूजनीय जन्मस्थानावर दगडी खांब असलेले मंदिर बांधले.
महाराजा विक्रमादित्य यांनी बांधले होते भव्य श्रीराम मंदिर
भविष्य पुराणानुसार उज्जैनचे महाराजा विक्रमादित्य यांनी उजाड झालेल्या अयोध्येची पुन्हा एकदा (दुसऱ्यांदा) उभारणी केली होती. धार्मिक ग्रंथानुसार त्यांनी अयोध्येत शरयू नदीच्या लक्ष्मण घाटाच्या परिसरात ३६० मंदिरे बांधली होती. हिंदू पक्षाचा असा दावा राहिलेला आहे की, बाबरच्या आधीही आक्रमक सालार मसूदने १०३३ मध्ये श्रीरामजन्मभूमी मंदिर उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर या पवित्र मंदिराची पुनर्बांधणी (तिसऱ्यांदा) गहडवाल वंशाच्या राजांनी केली.
१५१०- १५११ मध्ये गुरुनानक देवजींनी जन्मभूमीला भेट दिली
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या वादाची सुरुवात १५२८ मध्ये झाली. हिंदूंचा असा दावा आहे की, मुघल आक्रमक बाबरने ते पवित्र स्थान पाडून त्यावर मशीद बांधली. अयोध्या श्रीरामजन्मभूमी वादावर ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने शीख ग्रंथ महत्त्वाचा पुरावा मानला आहे. ज्यानुसार शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी यांनी आक्रमक बाबर भारतात येण्यापूर्वीच श्रीरामजन्मभूमीचे दर्शन घेतले होते. गुरू नानक देवजी १५१० ते १५११ च्या दरम्यान अयोध्येत आले होते. तर, बाबरी मशीद १५२८ मध्ये बांधली गेली होती. इतिहासकारांच्या मते बाबरच्या सांगण्यावरून त्याच्या एका सुभेदाराने तिथे मशीद बांधली होती.
श्रीराम मंदिराचा इतिहास
२३ डिसेंबर १९४९ रोजी रामलल्लांची मूर्ती आत सापडली. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या इतिहासात २३ डिसेंबर १९४९ रोजी एक वळण आले. त्या दिवशी अचानक रामलल्लांची मूर्ती आतील बाजूला विराजमान असलेली दिसली. हा वाद इतका वाढला की, शेवटी तत्कालीन सरकारने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून ही वास्तू वादग्रस्त मानली आणि त्याला टाळे ठोकले. आतील नमाज थांबली. पण, बाहेर श्रीराम चबुतरा आणि परिसरात उर्वरित भागात पूजा निरंतर सुरूच राहिली.
१८५९ मध्ये पुन्हा पूजा करण्याची परवानगी
जन्मभूमीच्या आसपासच्या भागात प्रथम १८५३ मध्ये दंगलीचा उल्लेख सापडतो. १८५९ मध्ये इंग्रजांनी मुस्लिमांना आतील बाजूला, तर हिंदूंना श्रीराम चबुतऱ्यावर पूजेची परवानगी दिली. १८८५ मध्ये महंत रघबीर दास यांनी पहिल्यांदा मंदिर बांधण्याबाबत फैजाबाद न्यायालयात याचिका दाखल केली. ती न्यायालयाने फेटाळली.
१९८९ मध्ये वादग्रस्त जागेजवळ पायाभरणी
ऑगस्ट १९८९ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने फैजाबाद जिल्हा न्यायालयाकडून खटला वर्ग करून घेतला आणि वादग्रस्त जमिनीवर यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. नोव्हेंबर १९८९ मध्ये तत्कालीन सरकारने पायाभरणी करण्यास परवानगी दिली.
अलाहाबाद हायकोर्टाने दिला निर्णय
एप्रिल २००२ पासून अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीच्या मालकी हक्कांवर सुनावणी सुरू केली. ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही मालमत्ता तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निर्णय दिला. जन्मभूमीसह एक तृतीयांश हिस्सा हिंदूंना, एक तृतीयांश हिस्सा निर्मोही आखाड्याला आणि तिसरा हिस्सा मुस्लीम समुदायाला दिला.