महादेव ॲप घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा झाला संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:26 PM2023-12-07T13:26:10+5:302023-12-07T13:26:33+5:30
एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुशील दास रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते
दुर्ग : महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातील आरोपी असीम दास याच्या वडिलांचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गावात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुशील दास (६२) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी आंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अछोटी गावातील विहिरीत आढळून आला असून प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दुर्गचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. राम गोपाल गर्ग म्हणाले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या प्रकरणातील असीम दास याचे ते वडील होते. एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुशील दास रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते, परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती गर्ग यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्यात अनेक अभिनेतेही अडकले आहेत.
आरोप काय?
असीम दास आणि आणखी एक आरोपी हवालदार भीम सिंह यादव यांना ईडीने ३ नोव्हेंबरला अटक केली होती. ईडीने दावा केला आहे की, फॉरेन्सिक विश्लेषण आणि दास याने केलेल्या विधानांनुसार महादेव सट्टेबाजी ॲप प्रवर्तकांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत सुमारे ५०८ कोटी रुपये दिले आहेत.