‘३७०’ हटल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पहिलीच विधानसभा निवडणूक; १० वर्षांनी 'जनमत' चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 11:30 AM2024-08-17T11:30:05+5:302024-08-17T11:30:36+5:30
प्रादेशिक समीकरणे माेठ्या प्रमाणावर बदलली, जागा वाढल्या, संधी काेणाला मिळणार?
सुरेश डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनी विधानसभा निवडणूक हाेणार आहे. कलम ३७० हटविल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या १० वर्षांमध्ये विशेषत: कलम ३७० हटविल्यानंतर या भागातील परिस्थिती माेठ्या प्रमाणावर बदलली आहे. २०१९पर्यंत जम्मू-काश्मीर आणि लडाख हा एकाच राज्याचा भाग हाेता. मात्र, कलम ३७० हटविल्यानंतर या भागाला वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे विधानसभेच्या जागांची संख्या बदलली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी ८३ जागा हाेत्या. यावेळी ९० जागांवर निवडणूक हाेणार आहे. ७ जागा यंदा वाढल्या आहेत. त्यापैकी ६ जागा जम्मू आणि १ जागा काश्मीर भागात वाढली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये २४ जागा आहेत. मात्र, त्यावर मतदान हाेणार नाही.
- गेल्या निवडणुकीत काय झाले हाेते?
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये ८७ जागा हाेत्या. त्यात लडाखच्या ४ जागांचाही समावेश हाेता. त्या निवडणुकीत २८ जागा जिंकून पीडीपी हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला हाेता. त्याखालाेखाल २५ जागा भाजपने जिंकल्या हाेत्या. काेणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे तेथे राज्यपाल शासन लागू झाले. अशा स्थितीत मार्च २०१५ मध्ये पीडीपी आणि भाजपने युती करून सरकार स्थापन केले. हे सरकार १८ महिनेच टिकले हाेते. जून २०१८मध्ये ही युती तुटली आणि राज्यपाल शासन लागू झाले.
- जम्मू-काश्मीरमधील ८९ अधिकाऱ्यांच्या बदल्या
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या आदेशांनुसार जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी रात्री त्या केंद्रशासित प्रदेशातील ८९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्याच वरिष्ठ पदांवरील पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवीन प्रभात यांना जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील आर. आर. स्वैन हे येत्या ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
- दल लेकमध्ये तीन तरंगती मतदान केंद्रे
जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरमधील दल लेक येथे तीन तरंगती मतदान केंद्रे, नियंत्रण रेषेजवळ अनुसूचित जमातीची १०० टक्के लोकवस्ती असलेल्या ठिकाणी एक अशी खास मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
- सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक
- आयाेगाच्या अहवालानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये ७ जागा वाढल्या. मार्च २०२४मध्ये लाेकसभा निवडणूक जाहीर केली, त्यावेळी सुरक्षेच्या कारणांमुळे लाेकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यास जम्मू-काश्मीर प्रशासनाने नकार दिला हाेता.
- डिसेंबर २०२३मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०२४पर्यंत विधानसभा निवडणूक घेण्याचे आदेश दिले हाेते. हा आदेश विचारात घेऊनच निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
- २०२०मध्ये सुरू झाली हाेती मतदारसंघांच्या सीमांकनाची प्रक्रिया
जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश जाहीर झाल्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक
- विधानसभेच्या जागा - ११४. त्यातील ९० केंद्रशासित प्रदेश व २४ जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी राखीव आहेत.)
- जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुका या डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल व महापालिका, पंजायती राज संस्था यांच्या होत्या. २८ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या निवडणूका पार पडल्या होत्या.
- जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांकनाची प्रक्रिया फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये सुरू झाली.
जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्ष
- भारतीय जनता पक्ष
- बहुजन समाज पक्ष
- माकप
- काँग्रेस
- जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
- जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
- जम्मू-काश्मीर अपनी पार्टी
- जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी
- जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट पार्टी
- जम्मू-काश्मीर वर्कर्स पार्टी
- पँथर पार्टी
- डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी
जम्मू-काश्मीर राज्य झाल्यावर झालेल्या विधानसभा निवडणुका
निवडणुकीचे वर्ष विधानसभा जागा विजयी पक्ष विजयी पक्षाने जिंकलेल्या जागा
१९५१ (कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली) ७५ नॅशनल कॉन्फरन्स ७५
१९५७ (पहिली विधानसभा) ७५ नॅशनल कॉन्फरन्स ६९
१९६२ (दुसरी विधानसभा) ७४ नॅशनल कॉन्फरन्स ६८
१९६७ (तिसरी विधानसभा) ७५ काँग्रेस ६०
१९७२ (चौथी विधानसभा) ७५ काँग्रेस ५८
१९७७ (पाचवी विधानसभा) ७६ नॅशनल कॉन्फरन्स ४७
१९८३ (सहावी विधानसभा) ७६ नॅशनल कॉन्फरन्स ४६
१९८७ (सातवी विधानसभा) ७६ नॅशनल कॉन्फरन्स ४०
१९९७ (आठवी विधानसभा) ८७ नॅशनल कॉन्फरन्स ५७
२००२ (नववी विधानसभा) ८७ पीडीपी १६ काँग्रेस २० नॅशनल कॉन्फरन्स २८
२००८ (दहावी विधानसभा) ८७ नॅशनल कॉन्फरन्स २८ काँग्रेस १७ पीडीपी २१ भाजप ११
२०१४ (अकरावी विधानसभा) ८७ पीडीपी २८ भाजप २५ नॅशनल कॉन्फरन्स १५ काँग्रेस १२
दाेन दशकांतील सर्वांत कमी कालावधीची निवडणूक
जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी ४ किंवा त्यापेक्षा जास्त टप्प्यात निवडणूक व्हायची. मात्र, यावेळी ३ टप्प्यांमध्ये निवडणूक हाेणार आहे. त्यामुळे गेल्या दाेन दशकांमधील सर्वांत कमी कालावधीची निवडणूक ठरणार आहे.