पहिले चार्टर विमान आज रात्री इस्त्रायलहून रवाना होणार; २३० भारतीय मायदेशी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 03:13 PM2023-10-12T15:13:36+5:302023-10-12T15:15:02+5:30

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने ७ ऑक्टोबर रोजी आपली हवाई सेवा बंद केली होती.

The first charter flight will leave for India from Ben Gurion Airport tonight; 230 Indians will return home | पहिले चार्टर विमान आज रात्री इस्त्रायलहून रवाना होणार; २३० भारतीय मायदेशी परतणार

पहिले चार्टर विमान आज रात्री इस्त्रायलहून रवाना होणार; २३० भारतीय मायदेशी परतणार

इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यातील युद्धादरम्यान तिथून परतणाऱ्या भारतीयांसह पहिले चार्टर विमान आज रात्री बेन गुरियन विमानतळावरून भारतासाठी रवाना होईल. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की हे विमान आज रात्री ९ वाजता इस्रायलहून २३० भारतीयांना घेऊन निघणार आहे. या प्रवासाचा संपूर्ण खर्च भारत सरकार करणार आहे.

ऑपरेशन अजय अंतर्गत, ज्या लोकांना इस्रायलमधून भारतात परतायचे आहे, परंतु हवाई सेवा उपलब्ध नसल्यामुळे ते परत येऊ शकत नाहीत अशा लोकांना मदत करण्यासाठी या विमानाची व्यवस्था केली जात आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने ७ ऑक्टोबर रोजी आपली हवाई सेवा बंद केली होती. या सेवा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. 

सुमारे १८ हजार भारतीय नागरिक कामासाठी किंवा अभ्यासासाठी इस्रायलमध्ये राहत आहेत. येथे राहणार्‍या भारतीयांचा मोठा भाग काळजीवाहू म्हणून काम करतो, परंतु तेथे सुमारे एक हजार विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारी देखील आहेत. भारत आपल्या नागरिकांना इस्त्रायलमधून मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. यामध्ये २४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १२०० लोक मारले गेले आहेत, तर गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाच्या गोळीबारात १२०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हमास दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझाला इस्रायलने चारही बाजूंनी घेरले असून, २३ लाख लोक शहराबाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत.

नागरिकांच्या मदतीसाठी धावाधाव

मानवतावादी गट इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत; परंतु, गाझाच्या तीव्र नाकेबंदीमुळे व लढाईमुळे ते गुंतागुंतीचे होत आहे. इजिप्तच्या रेड क्रॉस संघटनेकडून दाेन टनापेक्षा जास्त वैद्यकीय पुरवठा गाझाला पाठविण्यात आला आहे. अन्न आणि इतर वितरण आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कैद्यांच्या सुटकेसाठी ओलिसांचा वापर

हमासच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले की, गाझामधील विध्वंसक युद्ध सुरू राहिल्यास इराण आणि हिजबुल्लासारखे मित्र या लढाईत मदतीला येतील. २०१४ च्या युद्धापासून हमास स्वतःचे रॉकेट आणि प्रशिक्षित सैनिक तयार करत आहे. ओलिस ठेवलेल्या शेकडो इस्रायलींचा वापर इस्रायली आणि  सर्व अरब तसेच पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी करेल, असेही ते म्हणाले.

इस्रायलच्या बाजूने कोणते देश उतरले? 

युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली हे देश एकत्र आले आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी एकत्र येत युद्धाबाबत चर्चा केली. दहशतवादाला कधीही समर्थन नाही, असे या देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: The first charter flight will leave for India from Ben Gurion Airport tonight; 230 Indians will return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.