‘बिमस्टेक’चा कारभार प्रथमच भारतीयाकडे; इंद्रमणी पांडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 10:21 AM2023-10-22T10:21:03+5:302023-10-22T10:22:01+5:30
‘बिमस्टेक’मध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सात देशांची संघटना ‘बिमस्टेक’च्या सरचिटणीस म्हणून अनुभवी राजनैतिक अधिकारी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती झाली आहे. प्रथमच एखाद्या भारतीय अधिकाऱ्याची या पदी नियुक्ती झाली आहे. ‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि- सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ अर्थात ‘बिमस्टेक’मध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश आहे.
प्रादेशिक सहकार्य वाढविण्यावर भर
पांडे हे १९९० च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी असून, सध्या संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून जिनिव्हा येथे कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पांडे यांची बिमस्टेकचे पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती जाहीर केली. पांडे हे भूतानचे तेन्झिन लेकफेल यांच्यानंतर बिमस्टेकचे सरचिटणीसपद भूषवतील. बंगालच्या उपसागरात प्रादेशिक सहकार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारकडून बिमस्टेकला खूप महत्त्व दिले जात आहे.