गरिबांचा आहार पुन्हा महागणार, तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:41 AM2022-09-20T09:41:01+5:302022-09-20T09:41:57+5:30

खरीप उत्पादनात घट झाल्याने तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता

The food of the poor will become expensive again, the price of rice is likely to increase | गरिबांचा आहार पुन्हा महागणार, तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता

गरिबांचा आहार पुन्हा महागणार, तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : खरीप हंगामात भाताची लागवड कमी झाल्याने तांदळाचे उत्पादन तब्बल ६० ते ७० लाख टनांनी कमी राहण्याची भीती आहे. यामुळे तांदळाच्या किमती पुन्हा एकदा वाढणार आहेत. अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा ताण वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपासून घसरत असलेला किरकोळ महागाईचा दर पुन्हा वाढू लागला असून, अन्नधान्यासह सर्व खाद्यपदार्थांच्या किमती वाढत असल्याने, ऑगस्टमध्ये महागाई ७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी आगामी काळात महागाई उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस आणि नैऋत्य मोसमी पावसाने अद्याप परतीचा प्रवास सुरू न केल्याने भातपिकाची चिंता वाढली आहे.
२०२१-२२ मध्ये भारताचे तांदूळ उत्पादन १३.०२९ कोटी टन होते, जे एका वर्षापूर्वी १२.४३७ कोटी टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६०-७० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे. 

भारताने चिंता करावी का?
n काही तज्ज्ञांच्या मते, तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही.
n भारताकडे आधीच असलेला साठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेची (पीडीएस) मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.
n याशिवाय तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमतीच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.

जगभरात वाढल्या तांदळाच्या किमती
n भारताकडून निर्यातबंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमतीत प्रति टन ३५ डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. २० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे ५९ लाख टन तांदूळ भारताबाहेर जाणार नाही. 
n यामुळे २०२२-२३ मध्ये देशातून होणारी तांदूळ निर्यात २५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

आरबीआय काय म्हणते?
रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, इंधन, तसेच इतर वस्तूंच्या किमतीत सवलत देऊनही अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे खाद्यपदार्थांच्या किमती दबावाखाली आहेत.

सरकार काय म्हणते?
खरीप हंगामात पीक पेरणी झालेले क्षेत्र कमी असल्याने, कृषी मालाच्या साठ्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याची गरज अर्थमंत्रालयाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. याच वेळी महागाईच्या मुद्द्यावर आता बेफिकीर राहणे टाळले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे.

तांदळामुळे देशांतर्गत महागाईचा लगेच कोणताही धोका नाही. एमएसपी आणि खते आणि इंधनासारख्या इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे किमतीत वाढ झाली. त्यामुळे महागाईत नक्कीच काही प्रमाणात वाढ होणार आहे.    - रमेश चंद, नीती आयोगाचे सदस्य

पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब
देश    किंमत    वाढ 
थायलंड    ४३०    ०२
व्हिएतनाम    ४०३    १०
पाकिस्तान    ३९०    ३५
(प्रति टन डॉलरमध्ये)

सरकारकडे किती साठा शिल्लक
    २०२१    २०२२    टक्के
तांदूळ    २६८.३२    २४४.६३    -८.८%
गहू    ५१७.८३    २४८.२२    -५२.१%
    (लाख टनांमध्ये)

 

Web Title: The food of the poor will become expensive again, the price of rice is likely to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.