जी-२०: उद्यापासून जग पाहणार भारताचे सामर्थ्य; ‘भारत वाद्य दर्शनम’मधून देशाचे सांगीतिक दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:44 AM2023-09-08T06:44:19+5:302023-09-08T06:44:27+5:30
भारताच्या अध्यक्षतेत ९ सप्टेंबरपासून दिल्लीत जी-२० शिखर परिषदेला सुरुवात होत आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेत ९ सप्टेंबरपासून दिल्लीतजी-२० शिखर परिषदेला सुरुवात होत आहे. देशविदेशातून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्लीला नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी जमिनीपासून आकाशापर्यंत कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यानिमित्त ८ ते १० सप्टेंबरपर्यंत नवी दिल्लीत तीन दिवस अघोषित लॉकडाऊन सुरू होणार आहे.नवी दिल्लीत शुक्रवारपासून अनेक देशांच्या अध्यक्ष - पंतप्रधानांसह ब्राझील, इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियनचे २७ देशांचे प्रतिनिधींचे आगमन होणार आहे.
‘भारत वाद्य दर्शनम’मधून देशाचे सांगीतिक दर्शन
देशविदेशातील पाहुण्यांना भारतीय कला-संस्कृतीचे दर्शन होणार आहे. गंधर्व आतोद्यम समूहाद्वारे ‘भारत वाद्य दर्शनम’च्या माध्यमातून भारताचा सांगीतिक प्रवास ७८ कलाकारांकडून सादर होईल. हा कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आयोजित स्नेहभोजनावेळी सादर केला जाईल.
मोदी-बायडेन चर्चा करणार
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्वीपक्षीय संबंधावर चर्चा करतील. यावेळी भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. स्वच्छ ऊर्जा, व्यापार, नवतंत्रज्ञान, संरक्षण आदींसह विविध प्रश्नांवर मोदी आणि बायडेन चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.