मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झालंय; १,४३० गावांचा कुस्तीपटूंना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:23 AM2023-04-27T08:23:06+5:302023-04-27T08:23:22+5:30
ब्रिजभूषण यांची चौकशी गरजेची : दिल्ली पोलिसांची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ हरयाणाच्या खाप पंचायती २७ एप्रिलला दिल्लीत पोहोचणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एक बजरंग पुनिया यांनी खाप पंचायतींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झाले आहे, असे मत खाप पंचायतींनी व्यक्त केले. १४३० गावांच्या खाप पंचायतींचे प्रवक्ते जगबीर मलिक यांनीदेखील कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यापूर्वी त्यांची प्राथमिक चौकशी करणे गरजेचे आहे, असे दिल्ली पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. दरम्यान, कुस्तीपटूंना देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन वाढत असून, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.