भिंत तोडून मालगाडी थेट पार्किंगमध्ये घुसली अन् सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:19 AM2022-03-15T09:19:03+5:302022-03-15T09:19:29+5:30
अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. मालगाडी भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसल्याने रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ माजली.
फरिदाबाद – सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातं देशात भारतीय रेल्वेचं मोठं नेटवर्क आहे. लाखो लोकं दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. इतकेच नाही तर रेल्वेने मालवाहतूकही होते. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते. देशात होणारे रेल्वे अपघात रोखण्यासाठी अलीकडेच रेल्वेने कवच प्रणालीचं अनावरण केले होते. परंतु हरियाणात झालेल्या एका रेल्वे अपघातानं सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला
हरियाणाच्या ओल्ड फरिदाबाद रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी थेट भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसली. ज्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. मालगाडी भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसल्याने रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ माजली. यावेळी एका रेल्वे कर्मचाऱ्याचा जीव सुदैवाने थोडक्यात बचावला. रेल्वे निरीक्षक एके गोयल यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. ट्रेनच्या मागे उभा असलेला रेल्वे कर्मचारी नशीब बलवत्तर म्हणून सुखरुप बचावला.
कसा झाला अपघात?
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना जेव्हा सिमेंटची भरलेली पोती घेऊन एक मालगाडी गंगापूरहून ओल्ड फरिदाबाद स्टेशनला पोहचली. ट्रेन माल उतरवण्यासाठी मागील बाजूस जात होती. तेव्हा रेल्वे यार्डमध्ये जाताना लोका पायलट आणि कर्मचारी यांच्यातील संवाद तुटला त्यामुळे मालगाडीचा मागील डबा संरक्षक भिंत तोडून थेट स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंग एरियात घुसली.
...तर झाला असता मोठा अपघात
अपघातावेळी संरक्षक भिंत तोडून मालगाडी पार्किंगमध्ये घुसली तेव्हा एकही व्यक्ती त्याठिकाणी नव्हता. तिथे उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले. मात्र जीवितहानी टळली. ट्रेनच्या कचाट्यात अडकलेली एक कार पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला की तांत्रिक बिघाड होता? याबाबत अद्याप माहिती नाही. आता रेल्वे अधिकारी या अपघाताची चौकशी करणार असल्याचं सांगत आहेत.
रेल्वे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहचले. ४२ डब्याची रेल्वे नियंत्रण सुटल्याने पार्किंग परिसरात घुसली. त्यात वाहनांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा केल्यानंतर मालगाडीचे डबे कापून वेगळे करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरू होतं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही.