"2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला"; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:39 IST2025-01-13T19:38:06+5:302025-01-13T19:39:30+5:30
मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केलेल्या विधानावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सडकून टीका केली आहे.

"2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला"; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले
Ashwini Vaishnaw Mark Zuckerberg News: २०२४ मध्ये भारतासह अनेक देशात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला हा मार्क झुकरबर्ग यांनी केलेला दावा चुकीचा आहे, असे म्हणत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्ग यांना सुनावले. झुकरबर्ग यांनी सत्यता आणि विश्वसनीयता कायम ठेवली पाहिजे, असे वैष्णव म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय रेल्वे तथा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क झुकरबर्गच्या विधानावर आक्षेप घेत एक पोस्ट लिहिली आहे.
तथ्यांनुसार हे चुकीचे आहे -वैष्णव
अश्विनी वैष्णव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "जगातील सर्वात मोठी लोकशाही असेलल्या भारतात निवडणूक पार पडली आणि ६४० मिलियनपेक्षा अधिक मतदारांनी यात सहभाग घेतला. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास दर्शवला. झुकरबर्ग यांचा हा दावा चुकीचा आहे की, कोविडनंतर भारतासह २०२४ मध्ये जगात झालेल्या निवडणुकांत सत्ताधारी सरकार पराभूत झाली, हा दावा तथ्यांनुसार चुकीचा आहे."
"800 मिलियन लोकांना मोफत धान्य, २.२ लोकांना मोफत लसीकरण आणि कोविड काळात जगातील इतर देशांना मदत करण्यापासून ते सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यापर्यंत... पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा निर्णायक विजय प्रशासन आणि जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे", असेही वैष्णव यांनी म्हटले आहे.
"मार्क झुकरबर्ग यांच्याकडून चुकीची माहिती दिली जाणे, हे निराशाजनक आहे. सत्य आणि विश्वसनीयता कायम ठेवा", असा टोला वैष्णव यांनी मार्क झुकरबर्ग यांना लगावला.
मार्क झुकरबर्ग काय म्हणाले?
जो रोगन यांच्यासोबत झालेल्या पॉडकास्टमध्ये बोलताना मार्क झुकरबर्ग यांनी २०२४ च्या निवडणुकीबद्दल एक विधान केलं होतं.
2024 मध्ये जगभरात झालेल्या निवडणुकांचा उल्लेख करत मार्क झुकरबर्ग म्हणालेले की, "२०२४ हे वर्ष जगभरात निवडणुकांचं वर्ष राहिले आणि भारतासह अनेक देशात निवडणुका झाल्या. जवळपास सर्वच सत्ताधारी निवडणुकीत पराभूत झाले. पूर्ण वर्षात कुठल्या ना कुठल्या स्वरुपाची जागतिक पटलावर परिणाम करणारी घटना घडल्या. मग ते मुद्रा धोरण असो की, कोविडचा सामना करण्यासाठीची आर्थिक धोरणे किंवा सरकारच्या कोविडचा सामना करण्याच्या कार्यपद्धती, असे वाटते की याचा परिणाम जागतिक स्वरुपावर झाला होता."