"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 18:16 IST2024-07-05T18:01:46+5:302024-07-05T18:16:30+5:30
Narendra Modi Government: इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे.

"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे मोदी आणि भाजपाला एनडीएमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याच्या आधारावर सरकार स्थापन करावं लागलं आहे. आता मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थैर्यााबाबत विरोधी पक्षांकडून सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे. तसेच हे सरकार फार काळ चालणार नाही, असा दावाही केला जात आहे. दरम्यान, इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे.
केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेलं सरकार खूप कमकुवत असून, ऑगस्ट महिन्यात हे सरकार कोसळेल, असं भाकित लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाटणा येथील कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे. आता आपला पक्ष आणखी मोठी झेप घेईल, असा मला विश्वास आहे. दुसरीकडे केंद्रात सत्तेवर आलेलं मोदी सरकार खूप कमकुवत आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात हे सरकार कोसळेल.
यावेळी आरजेडी नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, आमचा पक्ष सत्तेत राहिला आहे. तस्ते बाहेरही राहिलेला आहे. चांगला आणि वाईट काळ पाहिला आहे. मात्र आम्ही आमच्या विचारसरणीशी कधीही तडजोड केलेली नाही. आम्ही आपला संघर्ष सुरू ठेवला आहे. त्याला कधी यश आलंय, तर कधी अपयश आलंय, मात्र आमचे कार्यकर्ते नेहमी अढळ राहिले आहेत.
आरजेडी बिहारच्या विधानसभेतील मोठा पक्ष बनली आहे. आधी आम्ही जनता दलाचा भाग होतो. नंतर आमचा मार्ग वेगळा झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या मतांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर एनडीएची मतं घटली आहेत. तसेच आम्ही मागच्या वेळपेक्षा ९ जागा अधिक जिंकल्या आहेत.